“आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोधही नाही. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसींमधून आरक्षण मागू नये”, असा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. भटक्या विमुक्त जाती—जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापुरातील ओबीसी निर्धार मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार म्हणाले कि, “आमचा मराठा समाजावर रोख नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. उलट आम्ही पाठिंबाच देऊ. मात्र, प्रस्थापितांनी ओबीसीमधून आरक्षण मागू नये. आमच्या आरक्षणात प्रस्थापित आले तर इथे कोण टिकणार?”असा सवाल करतानाच “हात जोडून विनंती करतो पण ओबीसींमधून आरक्षण मागू नका”, असं विजय वड्डेटीवार यावेळी म्हणाले.

मोदींच्या भेटीसाठी वडेट्टीवारांची बावनकुळेंना साद

ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू असं सांगताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर यावेळी विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “आम्हाला मोदींकडे घेऊन चला” अशी सादच घातली आहे.

…तर निवडणुका होऊ देणार नाही! पुन्हा इशारा

वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले, ३१ ऑगस्ट १९५२ रोजी देशाचे भाग्यविधाते पं. जवाहरलाल नेहरूंनी भटक्या विमुक्त जाती-जमातींवरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना तारेच्या कुंपणातून मुक्त केले. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटनेला ७० वर्षे लोटली तरीही भटक्या विमुक्तांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदलला नाही. भटक्या विमुक्त जाती-जमातींसह ओबीसी समाजाने प्रस्थापितांविरुध्द लढण्याची ताकद निर्माण केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत. हक्क मागणे हा गुन्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातींना एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केले. परंतु आज काहीजण महाराज ‘आमचे-तुमचे’ अशा भेदभावाची भाषा करतात. या सत्तेला झुकविण्याची ताकद निर्माण करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय आगामी कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, या इशाऱ्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

वडेट्टीवार आणि बावनकुळे एका मंचावर

ओबीसींच्या या निर्धार मेळाव्यादरम्यान विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही एका मंचावर दिसले. त्याचसोबत, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, माकपचे नेते नरसय्या आडम, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ओबीसी मेळाव्याचे राज्य समन्वयक रामराव वडकुते हे देखील उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar warning to maratha leaders obc and maratha reservation gst
First published on: 01-09-2021 at 09:31 IST