राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले हे भारतीय जनता पक्षाचे तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे, पक्षीय मतभेद असले तरी दोघांनाही बंद पडणा-या सहकारी संस्था, गंभीर बनलेला पाणी व दुधाचा प्रश्न याचीच चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आता पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणा-या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्याला महत्त्व दिले जात आहे.
प्रवरा सहकारी बँकेच्या राहुरी येथील शाखेचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते तर आमदार कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दोन प्रमुख नेते एकत्र येणार असल्याने राजकीयदृष्टय़ा कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते. निमंत्रण पत्रिकेत नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांचे नाव होते. पण त्या अनुपस्थित राहिल्या. तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समर्थकांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तनपुरे साखर कारखान्यावर आलेल्या प्रशासकामुळे या प्रश्नाची चर्चा अपेक्षित होती. आमदार असूनही कर्डिले यांनी कारखान्याच्या राजकारणात कधीही हस्तक्षेप केला नाही. आतादेखील त्यांनी बंद पडलेल्या कारखान्याचा चेंडू विखे यांच्याकडेच टोलवला. विखे यांनीदेखील तुम्ही आता सत्तेत आहात त्यामुळे तुम्हीच प्रश्न सोडवा, असे सांगत कर्डिले यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रश्नांची टोलवाटोलवी झाली तरी दोघांनी एकत्र येण्याचे मान्य केले. आता राजकारणात तुटलेली विखे, कर्डिले युती जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर होणार का, असा प्रश्न पडला आहे.
कर्डिले यांनी कार्यक्रमात विखे यांची स्तुती केली. ते म्हणाले. बाबुराव दादा तनपुरे यांनी अनेक संस्था काढल्या. या संस्था बंद पडत आहेत. विखे कारखाना तोटय़ात होता. पण २०० ते ३०० किलोमीटर अंतरावरून ऊस आणून तो त्यांनी कर्जाच्या खाईतून बाहेर काढला. विखेंना दूरदृष्टी आहे. त्यांनी संस्था वाचविल्या, तसाच तनपुरे कारखाना वाचविण्याचा प्रयत्न करावा. मी जरी भारतीय जनता पक्षाचा आमदार असलो तरी या कामात विखे यांना मदत करीन. मला सहकारातील काही कळत नाही. विखेंनाच यातून मार्ग काढावा लागेल. राजकारणविरहित संस्था वाचविण्यासाठी तसेच दूधदर व पाणीप्रश्नावर एकत्र यावे, असे आवाहन कर्डिले यांनी या वेळी केले.