नगर लोकसभा मतदारसंघातील विखे समर्थक उघडपणे अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. विखे समर्थकांच्या या निर्णयामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली असली तरी राष्ट्रवादीने मात्र अजूनही सावध पवित्रा घेतला आहे. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, किंबहुना त्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
विखे समर्थक व नगर दक्षिणेतील युवक काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. दोन दिवसांपूर्वी या गटाची नगरलाच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदाधिकाऱ्यांनी नंतर बाळासाहेब विखे यांच्याशी चर्चाही केल्याचे समजते. त्यानंतरच नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार बी. जी. कोळसे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे. त्यादृष्टीने कामही सुरू केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गेल्या वेळीही या गटाने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांना मदत केली होती. मात्र मतदारसंघातील विकासकामांबाबत त्यांच्याकडून अपेक्षांची पूर्ती झाली नाही असे या गटाकडून आता सांगण्यात येते. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्याबरोबरच नगरमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांनाही हा धक्का मानला जातो.
विखे समर्थकांच्या या निर्णयाने जिल्हय़ात दोन्ही काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मुळातच नगर मतदारसंघातून कोळसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच राष्ट्रवादीचे नेते सावध झाले होते. त्यांच्या उमेदवारीबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरूच होती. दक्षिणेतील विखे समर्थकही तेव्हापासून आदेशाच्या प्रतीक्षेत होते, मात्र कोळसे यांना उघड पाठिंबा देऊन या गटाने अखेर त्यावर शिक्कामोर्तब केले.
शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयासाठी विखे पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीशी पुन्हा सहमतीचे राजकारण सुरू केले आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे गेल्या महिनाभरापासून त्यासाठी प्रयत्नशील आहेत. शंकरराव कोल्हे, भानुदास मुरकुटे, यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे यांच्याशी त्यांनी सहमती सुरू केली, मात्र नगर मतदारसंघातील विखे समर्थकांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते. विशेष म्हणजे नगर मतदारसंघातील शरद पवार यांच्या प्रचारसभांमध्येही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हिरिरीने सहभागी झाले. शेतकरी, शेतमजूर, भूमिहीनांच्या प्रश्नांवर कोळसे यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. या वर्गाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी लढे दिले आहेत. या मुद्यावरच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विखे समर्थक पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र विखे समर्थकांच्या या निर्णयाने कोळसे यांच्या उमेदवारीला आता महत्त्व येण्याची चिन्हे आहेत.