श्रीरामपूरचे गतवैभव भकास झाले असून गुन्हेगारांचे अड्डे वाढले आहेत. त्याचा त्रास जनतेला होत असून, तालुक्यात आता मिजासखोरीचे राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या विकृती व प्रवृत्तीला आपला ठाम विरोध असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातील उमेदवार इंद्रभान थोरात यांना आपण पाठिंबा देत आहोत, असे पत्रक ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी बुधवारी प्रसिद्धीस दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नात जे आडवे येतील त्यांना आडवे करण्याचे काम आपले आहे, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला आहे.
बँक निवडणुकीच्या धामधुमीत विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक थोरात यांना पाठिंबा देणाऱ्या पत्रकात नाव न घेता माजी आमदार जयंत ससाणे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. पत्रकात विखे यांनी म्हटले आहे, श्रीरामपूरचे नेते राजकारणात दिलेला शब्द पाळत नाहीत. जिल्हा परिषदेतील बेलापूर गटातील निवडणूक हे त्याचे उदाहरण आहे. आपण सामान्यांचे मित्र व कैवारी आहोत. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात नेहमीच उभे राहिलो. औद्योगिक वसाहतीत राधाकृष्ण व मी हस्तक्षेप केल्याने उद्योजकांना भूखंड मिळाले. पूर्वी शहरात सर्वसमावेशक अभिसरणाचे राजकारण होते. शहराचे नेतृत्व कोण करतो हे सर्वाना माहीत आहे. बेनामी जागा खरेदी, इमारती, बांधकाम, पॅलेसवाल्यांची काय परिस्थिती आहे हे सर्वाना माहीत आहे. विविध मार्गानी लूट चालू असून त्याचा अतिरेक होत आहे. त्याला आळा बसला पाहिजे.
श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी परिस्थिती आहे. पद्मश्री विखे यांचा वारसा मी, राधाकृष्ण व डॉ. सुजय चालवत आहोत. नेत्यांनी गावागावांत भांडणे लावण्याचे काम केले. आम्ही गावांत सलोखा राहावा व विकास व्हावा म्हणून प्रयत्न करतो. पण काही गावांत दोन सेवा संस्था स्थापन करून त्यांचा व्यवहार काहीच नाही, परंतु या संस्था मतासाठी की ठराविक समाजासाठी, असा सवालही विखे यांनी विचारला आहे. खंडकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. त्याचे खरे श्रेय त्यांनाच आहे. इतरांची स्वार्थी लुडबूड सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.