|| प्रदीप नणंदकर
लातूर : लातूरच्या राजकारणात विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख ही जोडगोळी प्रसिद्ध होती. विलासराव राज्यात तर दिलीपराव हे लातूरच्या राजकारणात लक्ष घालीत असत. आता देशमुख घराण्याने हाच प्रयोग कायम ठेवत अमित देशमुख यांनी राज्यात तर धाकटे बंधू आमदार धीरज यांनी लातूरवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यावर भर दिलेला दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र व लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी जाहीर केले. उपाध्यक्षपदी प्रमोद जाधव हेही बिनविरोध निवडून आले.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी १८ संचालक निवडून आले. त्यापैकी १० संचालकांची निवड बिनविरोध झाली होती. विधान परिषदेनंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा बँकेतूनही निवृत्त व्हायचे ठरवले व आपल्या कारभाराची सुत्रे आपले पुतणे धीरज देशमुख यांच्या हाती त्यांनी सुपूर्द केली.

४० वर्षापूर्वी लातूर व उस्मानाबाद जिल्हा एकत्र असताना जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट होती. अवसायानात निघालेल्या या बँकेवर दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आले व तेव्हापासून आजतागायत जिल्हा बँकेच्या कारभारात दिलीपरावांनी लक्ष घातले. अवसायानात निघालेली ही बँक राज्यातील अग्रणी बँकेत आपले स्थान टिकवून आहे.

बँकेने गेल्या ४० वर्षात विविध योजना आखत सामान्य शेतकऱ्याला आर्थिक मदत केली. त्यातून अनेकांचे संसार उभे राहिले.  नियोजनबध्द, पारदर्शी कारभारामुळे बँकेचा नावलौकीक वाढला.

विलासराव देशमुख व दिलीपराव देशमुख यांची जोडी जेव्हा राजकारणात आली तेव्हा विलासराव देशमुखांच्या राजकारणाला पूरक काम करण्याचे दिलीपरावांनी ठरवले. स्थानिक संस्थांमध्ये लक्ष घालत या संस्थांचे बळकटीकरण करत विलासराव देशमुखांच्या राजकारणाचा पाया भक्कम बनवण्याचे काम दिलीपरावांनी केले त्यामुळेच विलासरावांची वाटचाल गावच्या सरपंच पदापासून राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सुकर झाली.

विलासरावांच्या हयातीत लातूरच्या आमदारकीचा वारसा त्यांनी आपले ज्येष्ठ सुपुत्र अमीत देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. सध्या अमीत देशमुख हे तिसऱ्यांदा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत व राज्यात ते कॅबिनेट मंत्री आहेत. २०१९ मध्ये विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. सख्खे भाऊ विधानसभेत पोहोचण्याचे हे लातूर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एकमेव उदाहरण. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद धीरज देशमुखांकडे आल्यामुळे विलासराव – दिलीपराव देशमुखांच्या जोडगोळीने जसे पूर्वी राजकारण केले तशी आता अमीत देशमुख व धीरज देशमुखांची जोडगोळी काम करेल अशा अपेक्षा नागरिकांच्या आहेत.

जनसामान्यांच्या हाकेला ओ देत सतत लोकांत राहून ज्याप्रमाणे मागील पिढीने काम केले तोच वारसा पुढच्या पिढीने जपावा व वाढवावा अशी सार्थ अपेक्षा नव्या पिढीकडून व्यक्त होते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilasrao deshmukh in latur politics diliprao deshmukh as chairman of district central co operative bank congress akp
First published on: 07-12-2021 at 21:05 IST