scorecardresearch

तळीये गावाचे पुनर्वसन रेंगाळले; पावसाळा तोंडावर, ग्रामस्थ चिंताग्रस्त, प्रशासन सुस्त

पावसाळय़ापूर्वी तळीये गावाचे पुनर्वसन केले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.

हर्षद कशाळकर

अलिबाग : पावसाळय़ापूर्वी तळीये गावाचे पुनर्वसन केले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला तरी तळीयेतील ग्रामस्थांचे पुनर्वसनाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. २२ जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. तळीये कोंडाळकर वाडीतील ४० घरे या दरडीखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेत ८४ जणांचा मृत्यू झाला. भीषण दुर्घटनेनंतर गावाचे सुरक्षित स्थळी पुनवर्सन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आपद्ग्रस्त गावकऱ्यांना म्हाडा मार्फत अत्याधुनिक घरे बांधून दिली जातील असेही जाहीर केले होते. मात्र पावसाळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला तरी गावाच्या पुनर्वसनाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे आपद्ग्रस्त कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्यात राहण्याची वेळी आली आहे.

गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी गावाजवळील खाजगी जागा संपादित करण्यात आली. ही जागा पुनर्वसनासाठी सुरक्षित असल्याचा अहवालही भूवैज्ञानिकांनी दिला आहे. त्यामुळे आता या जागेवर २७१ कुटुंबांना घरे बांधून दिली जाणार आहेत. त्यासाठी गावकऱ्यांनी केलेली वाढीव क्षेत्राची घरे मिळावी ही मागणीही मंजूर केली आहे.

तळीये गावात तसेच कोंडाळकरवाडी व बौध्दवाडीमध्ये नागरी व सार्वजनिक सोयीसुविधा, विद्युतपुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करणे या कामांकरिता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला. पण मे महिना उजाडला तरी प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही.

पायाभूत सुविधांसाठी ९८ लाखांचा निधी..

गावात अंतर्गत सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. यासाठी ९८ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. यात शाळा बांधकाम टप्पा एकसाठी ४२ लाख, टप्पा दोनसाठी १३ लाख, अंगणवाडी बांधकामासाठी १० लाख तर बाजारपेठ उभारणीसाठी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पण या कामांनाही गती मिळालेली नाही.

तात्पुरत्या निवासासाठी कंटेनर हाऊस 

दरडग्रस्त गावातील नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध व्हावा यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून (सीएसआर) कंटेनर हाऊस मागविण्यात आले होते. तळीये गावासाठी २६ कंटेनर हाऊस उपलब्ध करून देण्यात आले. तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी शेड उभारण्याकरता बराच वेळ लागतो. त्यामुळे कंटरन हाऊसचा पर्याय निवडण्यात आला होता. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, रहेजा, जिंदाल, नरेलो आदींनी यासाठी कंटेनर हाऊस उपलब्ध करून दिले.

पुनर्वसनासाठी खाजगी जागा संपादित करावी लागली. या प्रक्रियेला वेळ गेला. त्यानंतर ती जागा ग्रामस्थांसाठी सुरक्षित आणि योग्य आहे का याचीही चाचपणी केली गेली. आता ही सर्व कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पुनर्वसनाची कामे लवकरच सुरू होतील.

– सुनील तटकरे, खासदार

गावात पूर्वी २२४ घरे होती. मात्र पुनर्वसन करताना २७१ घरे दाखविण्यात आली आहेत. यातील काही घरे बेकायदेशीर कागदोपत्री दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने घरे कशी वाढली याची चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

– रुपेश पांडे, ग्रामस्थ

राज्य सरकारने गावातील लोकांचे पावसाळय़ापूर्वी पुनवर्सन करण्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्ष काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी घरे बांधून मिळतील असे वाटत नाही. शासनाने तातडीने यात लक्ष घालावे.

– प्रदीप कोंडाळकर, ग्रामस्थ

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Villagers administration sluggish before rains village rehabilitation announcement state government ysh

ताज्या बातम्या