अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील सारळ गावातील ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ गावात ठिकठिकाणी निषेध फलक झळकावत ग्रामस्थांनी चक्क निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावात ठिकठिकाणी याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत.

सारळ हे गाव समुद्रसपाटीपासून काहीशे मीटर अंतरावर, डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. गावात प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग असून वाढती लोकसंख्या आणि गावाचा विस्तार पाहता विद्यमान सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. विशेषतः गावातील रस्त्यांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांवरील प्रचंड धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.

यातच भर म्हणून एका खासगी मालकाने ग्रामस्थांच्या शेताकडे जाणारा, सार्वजनिक विहीर, शौचालयाकडे जाणारा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर अनेक कुटुंबांचा दैनंदिन वापर असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी, स्मशानभूमी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते तसेच आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर जोपर्यंत कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

“घरात नाही पाणी… गावच्या रस्त्याची धूळधाण… निवडणुकीवर बहिष्कार, हीच आमची वाणी… सारळ गावचा सगळ्या पक्षांवर बहिष्कार,” असे मजकूर असलेले फलक सध्या गावात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकीकडे जिल्हा प्रशासन १०० टक्के मतदानासाठी जनजागृती करत असताना, सारळ ग्रामस्थांचा हा पवित्रा शासनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे. आता प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.