प्रशासनासमोर भूमिका; नियोजित बंदराला जेएनपीटी अध्यक्षांची भेट

पालघर : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या अध्यक्षपदाची नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांनी वाढवण बंदराच्या नियोजित ठिकाणी बुधवारी सायंकाळी अचानक भेट दिली. याप्रसंगी वाढवण ग्रामस्थांनी समुद्रकिनारी एकत्र येऊन अधिकारी वर्गापुढे स्थानिकांची भूमिका मांडली.

१६ सप्टेंबरच्या सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अध्यक्ष सेठी, उपाध्यक्ष उमेश वाघ, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, पोलिसांच्या मोठय़ा ताफ्यासह वाढवण गावातील समुद्रकिनारी पोहोचले या सर्वानी बंदराच्या नियोजित ठिकाणाची पाहणी करून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला.

बंदराच्या ठिकाणाची पाहाणी करण्यासाठी अधिकारी वर्ग आल्याची माहिती मिळताच वाढवण गावातील उपसरपंच तसेच ग्रामस्थ किनाऱ्याजवळ  गोळा झाले, मात्र पोलिसांनी त्यांना अधिकारी वर्गाजवळ जाण्यापासून रोखले. नंतर दौऱ्यावर आलेल्या अधिकारी वर्गापुढे  विरोधाची भूमिका आणि बंदराला विरोध व्यक्त करण्याची संधी दिल्यानंतर स्थानिकांनी भूमिका आणि बंधाराविषयी विरोध शांतपणे व्यक्त केला. ग्रामस्थांनी या नियोजित बंदराला विरोध करण्यामागील अनेक कारणांची माहिती याप्रसंगी दिली.

या ठिकाणी प्रकल्प उभारताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करू, असे सांगण्यात आले. जेएनपीटीची सूत्रे स्वीकारल्यानंतर अध्यक्ष यांनी प्रथम वसई येथील त्यांच्या कंपनीच्या जमीन व नंतर नियोजित बंदराच्या ठिकाणाची पाहणी केली असे सोबत असलेल्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले.