प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात दोन शतकांचा वैभवशाली वारसा असलेल्या मुंबईच्या ‘दि एशियाटिक सोसायटी’वर अखेर उजव्या गटाचा झेंडा फडकला आहे. शनिवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या ‘एशियाटिक टुमारो’ गटाने मोठ्या फरकाने विजय संपादन केला. सहस्त्रबुद्धे गटाचे सर्व १९ उमेदवार मोठ्या फरकाने या निवडणुकीत विजय झाले आहेत.

नामवंत पत्रकार व काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर नेतृत्व करत असलेल्या ‘सेव्ह एशियाटिक’ गटाचा या निवडणुकीत पराभव झाला. १९ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २५३० मतदारांपैकी ५०८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. विनय सहस्त्रबुद्धे ३४९ तर कुमार केतकर यांना 157 मते पडली. भाजपचे तीन माजी खासदार निवडणुकीत उतरले होते. भाजपने आपली निवडणूक यंत्रणा कामाला जुंपली होती. मात्र मुसळधार पाऊस आणि सभासदांची उदासीनता यामुळे मतदान यावेळीसुद्धा अल्प राहिले.

वर्ष २०२४ ची निवडणूक मतदार याद्यांमुळे कमालीची वादग्रस्त ठरली होती. १० महिने लांबलेली निवडणूक दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. भाजप विरुद्ध इतर असे या निवडणुकीला स्वरुप आले हाेते. राज्यातील सत्ताधाऱ्यांचा निवडणुकीत हस्तक्षेप होत असल्याचा केतकर गटाचा आरोप होता. रात्री नऊ वाजता मतमोजणी पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तळोकर यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. त्यावेळी उपस्थित सहस्रबुद्धे गटाच्या पाठीराख्यांनी जय श्रीराम आणि वंदे मातरम… या घोषणा दिल्या.

विजयी उमेदवार :

1.अध्यक्ष – विनय सहस्त्रबुद्धे. 2.उपाध्यक्ष- चंद्रप्रकाश व्दिवेदी, नितीश भारव्दाज, रमेश पतंगे, संजय देशमुख. 3.सचिव – विवेक गणपुले. 4.कार्यकारी सदस्य – माधव भंडारी, मल्हार कुलकर्णी, प्राची मोघे, प्रमोद बापट, राजेश बेहरे, व्ही. एम. चक्रवर्ती. 5. छाननी समिती सदस्य- अभिजीत मुळे, अमोल जाधव, दत्तात्रय पंचवाघ, माधवी नरसाळे, मल्हार गोखले, स्नेहा नगरकर, उमंग काळे, असे एशियाटिक टुमारो गटाचे सर्व १९ उमेदवार विजयी ठरले.

कोण आहेत विनय सहस्रबुद्धे?

‘अभाविप’ मधून विनय सहस्त्रबुद्धे यांच्या कामांचा प्रारंभ झाला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ते उपाध्यक्ष राहिले आहेत. भाजपचे माजी राज्यसभा सदस्य आहेत. भाजपचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. एशियाटिक सोसायटीचे दोन वर्षे उपाध्यक्ष राहिले आहेत. विकास की राजनिती, हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. एशियाटिक सोसायटीचे उपक्रम मुंबई उपनगरात नेण्याचा नूतन अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी विजयानंतर बोलताना मानस व्यक्त केला.