मेटे यांच्या आमदारकीला राष्ट्रवादीकडून ब्रेक

राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांचे पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्याचे पत्रच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद सभापतींना दिले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीबरोबर गेलेले राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांचे पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्याचे पत्रच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद सभापतींना दिले आहे. मंगळवारी आमदार मेटे यांची सभापतींसमोर सुनावणी झाली असून १४ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे आमदार मेटे यांनी स्पष्ट केले.
 मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मेटे यांनी लढा उभा केला. मेळावे, मोच्रे काढून ही मागणी लावून धरली. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द देऊनही आरक्षण दिले नाही, या कारणावरून लोकसभा निवडणुकीपूर्वी मेटे यांनी महायुतीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षणही जाहीर केले. मात्र, आरक्षणाचा लढा उभारणारे मेटे यांची आमदारकी काढून घेण्यासाठी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात आली. पक्षांतराच्या कारणावरून हेमंत टकले यांनी तसा अर्ज दाखल केला आहे. यावर सभापतींसमोर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट सभापती यांना पत्र देऊन विनायक मेटे हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले आहेत. अद्यापपर्यंत पक्षातून त्यांना काढून टाकलेले नाही. परंतु २९ मार्च २०१४ रोजी त्यांनी स्वत:हून पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नाही तर सतत राष्ट्रवादी नेते व वरिष्ठांविरुद्ध ते जाहीर आरोप करत आहत. त्यांचे वागणे पक्ष हितविरोधी असल्याने टकले यांनी दाखल केलेल्या अर्जावर त्वरित निर्णय घेऊन पक्षांतराच्या कारणावरून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. मंगळवारी दुपारी विधान भवनात सभापतींसमोर या अर्जावर सुनावणीही झाली.
राष्ट्रवादीकडून सूड -मेटे
मराठा महासंघाच्या चळवळीतून आपण राजकारणात आलो. मागील १५ वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढा उभा केला. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर नेत्यांसमोर हा प्रश्न लावून धरला. तेव्हा देखील आमदारकी काढून घेण्याची धमकी दिली गेली. मात्र आपण समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही राहिलो, पण समाजाच्या नावावर राजकारण करणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांनी आपणाला संपवण्याचा प्रयत्न चालवला. परिणामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण वेगळी भूमिका घेतली. त्याचाच सूड उगवत असल्याचे स्पष्ट मत असल्याचे आ. मेटे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vinayak mete mla brake ajit pawar letter