कोकणातील गरीब शेतकरी आणि मागसवर्गीयांच्या जमिनी दलालांनी गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीला वनजमीन देण्यासाठी दलालांमार्फत कोकणात ५,००० हजार एकर जमिनी बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दलालांनी कोकणातील लोकांच्या जमिनी त्यांना न सांगता परस्पर विकून टाकल्याची माहिती राऊत यांनी दिली. खासदार राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राऊत म्हणाले की, “शेतकऱ्यांना दलालांच्या माध्यमातून लुबाडून त्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत. खरेदीवेळी दलाल हे प्रशासन व्यवस्थेला हाताशी धरून जमिनींची खरेदी विक्रीचे व्यवहार करत आहेत. एकट्या संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या घाटपट्ट्यातील २० गावांतील ५ हजार एकर जमीनीचे मागच्या काही वर्षांमध्ये तिथल्या ग्रामस्थांना फसवून खरेदी विक्री व्यवहार केले गेले. या जमिनी त्या-त्या कंपन्यांना विकल्या.” या कंपन्या अदानी समुहाशी संबंधित असल्याचंदेखील राऊत यांनी यावेळी सांगितलं.

आठ दिवसात शेकडो एकर जमिनींचे व्यवहार पार पडले

विनायक राऊत म्हणाले की, “वनखात्याला जी जमीन द्यायची होती ती या कंपन्यांना दिली. खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार करून जमिनी दिल्या आहेत. मी सध्या येथील दोन गावांमधील व्यवहार घेऊन आलो आहे. उर्वरित गावांची माहिती आगामी काळात सादर करू.” राऊत म्हणाले की, निगुडवाडी (संगमेश्वर) आणि कुंडी या गावातील १२३.४६ हेक्टर जमीन अलिकडच्या ८ दिवसात खरेदी केली गेली. ती जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यापैकी काही मालक हे मयत आहेत. या मयत व्यक्तींच्या जागी बोगस जीवंत माणसं उभी केली आणि त्यांच्या नावे खरेदी विक्रीचे व्यवहार केले गेले. यापैकी बहुतांश जमिनी या मागासवर्गीयांच्या आहेत.”

राऊत म्हणाले की, “कुचांबे ते वझरे या गावांमधील संगमेश्वरच्या घाटपट्ट्याचील ५ हजार एकर जमिनी थर्मल पॉवर जनरेशन करणाऱ्या कंपन्यांना दिल्या. या जमीनी RRWTL नावाच्या शासकीय कंपनीच्या नावे करण्यात आली आहे. ही कंपनी चंद्रपूरमध्ये औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प चालवते. ही कंपनी आता अदानी ट्रान्समिशन लिमिटेडच्या (एटीएल) ताब्यात आहे. या कंपनीला वीजप्रकल्पासाठी अधिक जमीन हवी होती.”

हे ही वाचा >> “राहुल गांधींनी माफी मागावी”, सावरकरांवरील वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ, संजय शिरसाट आक्रमक, म्हणाले, “यांनी कसाबचा…”

१२३.४६ हेक्टर जमीन बळकावली

खासदार राऊत यांनी सांगितल की, “एटीएलच्या चंद्रपुरातील प्रकल्पासाठी २८४.२७ हेक्टर जमीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु इथे उपलब्ध असलेली जमीन वन खात्यात येत होती, तरीही ही जमीन २०१५ साली एटीएलला देण्यात आली. परंतु आता प्रश्न निर्माण झाला की, या वनजमिनीच्या बदल्यात दुसरीकडे वनक्षेत्र निर्माण केलं असल्याचं दाखवायचं कसं? त्यामुळे त्यांनी यासाठी कोकणातील जमिनी बळकावण्याचा कट रचला. संगमेश्वरमधील जमिनींच्या मूळ मालकांना अंधारात ठेवून, मयत व्यक्तीच्या नावाने खोट्या व्यक्ती उभ्या करून त्यांच्या नावाने व्यवहार केले. संगमेश्वर तालुक्यातील दोन गावातील १२३.४६ हेक्टर जमीन RRWTL कंपनीच्या नावे करण्यात आली.”

राऊत यांनी यावेळी २ गावांमधील जमीनी बळकावल्याची कागदपत्र सादर केली. तसेच ते म्हणाले की, अशाच प्रकारे २० गावांमधील ५ हजार एकर जमीन ग्रामस्थांना फसवून बळकावण्यात आली आहे. त्याची माहिती लवकरच सर्वांसमोर सादर केली जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut alleges land mafia grabbed 5000 acre land in sangameshwar for gautam adani company asc
First published on: 23-03-2023 at 14:22 IST