रत्नागिरी : निवडणूक आयोगाकडून राज्यभर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची मोहीम सुरू असताना, त्याचाच राजकीय संदर्भ घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची खरी ‘पुनरावलोकन मोहीम’ आधीच पूर्ण झाल्याचा उपरोधिक टोला लगावला.

देवरुख येथे दक्षिण रत्नागिरी शिवसेनेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यापूर्वी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन बैठकीत बोलताना राऊत म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पुनरावलोकन मोहीम पार पडली आहे. शिवसेनेशी बेइमानी करणारे, स्वार्थासाठी निष्ठा विकणारे आणि संधीसाधू राजकारण करणारे अनेक जण पक्षातून निघून गेले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेचे शुद्धीकरण झाले आहे. आजची शिवसेना ही धुवून-पुसून स्वच्छ झालेली, गद्दारमुक्त आणि निष्ठावंत शिवसैनिकांची शिवसेना आहे.”

राज्यातील गेल्या दोन वर्षांतील राजकीय घडामोडी आणि पक्षफुटीचा संदर्भ देताना त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. “वादळात टिकून राहणारेच खरे शिवसैनिक असतात. संकटाच्या काळात ज्यांनी साथ सोडली, ते आपोआप बाजूला गेले. मात्र ठाकरे विचारांशी एकनिष्ठ राहिलेली फळी आज अधिक सक्षमपणे उभी आहे,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाची पुनरावलोकन मोहीम, संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय आव्हाने आणि तळागाळातील पक्षविस्तार यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक पदाधिकाऱ्याशी संवाद साधत आगामी काळात अधिक आक्रमकपणे जनतेमध्ये जाण्याचे आवाहनही केले.

विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलताना राऊत यांनी राजकारणातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. “आजचे राजकारण गढूळ झाले आहे. हे वातावरण बदलण्यासाठी आणि स्वच्छ राजकारण घडवण्यासाठी चांगल्या विद्यार्थ्यांनीही राजकारणात यायला हवे,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, आगामी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा करत त्यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले. “गद्दारमुक्त आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जिल्हा बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहे. जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र आणि संपूर्ण पॅनल मैदानात उतरविले जाईल,” असे जाहीर करत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

राऊत यांच्या या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात शिवसेना आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.