मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना त्यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, आता यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना किंमत देत नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे शिंदेगट-शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले विनायक राऊत?
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेशमधूनही शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहे. तसेच त्यांच्या पाठिशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. तसेच शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही. पक्षप्रमुख त्यांनी म्हटलंच पाहिजे, अशी आमची अपेक्षा नाही. त्यांची जागा नेमकी काय आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल, असेही ते म्हणाले.




मुख्यमंत्र्यांनी टाळला ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ट्वीट केले होते. यात त्यांनी त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला. मात्र, पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख टाळला. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत बंडखोर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी मी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर काहीही बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं होते.
शिंदे गटाच्या जाहीरातीही सामनाने नाकारल्या
राहुल शेवाळे यांनी माध्यामांशी बोलताना, “सामनात आमच्या जाहिराती नाकारताना कारणं सांगण्यात आली नाहीत. सामनाच्या कर्मचाऱ्यांनी या जाहिराती नाकारल्या. दरवर्षी सर्व खासदारांच्या सामनात जाहिराती असतात. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही जाहिराती पाठवल्या होत्या,” असे म्हणाले.