महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दोन बड्या नेत्यांची भेट या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे या दोघांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधे शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे, याबाबत सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीएत जाणार का? हा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी मागच्या १२ वर्षांपासून या चर्चा ऐकल्या आहेत. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात बैठक झाली ती कुठे? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला. त्यांना मुंबई असं सांगितलं असता त्या म्हणाल्या मला अशी कुठली बैठक झाल्याचं माहीत नाही. विनोद तावडे आणि मी देखील अनेकवेळा भेटलो आहे. आम्ही दोघंही जॉईंट पार्लमेंट्री कमिटीत आहोत. आम्ही दोघंही मागच्या महिन्याभरात २१ वेळा भेटलो असू, ते एकटेच नाही तर भाजपाच्या अनेक लोकांशी माझी भेट झाली आहे. ज्या काही चर्चा वगैरे चालल्या आहेत त्याची मला खरंच गंमत वाटते आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या
२०२९ मध्ये आम्हाला लढावंच लागेल-सुप्रिया सुळे
विनोद तावडे आणि मी भेटलो त्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. सकाळी ११ ते ५ या वेळेत आम्ही बरोबर होतो. विनोद तावडे होते, निशिकांत दुबे असतात. भाजपाचे अध्यक्षही तेव्हा उपस्थित होते. अनुराग ठाकूर होते अजून किती नावं सांगू? आमची भूमिका सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्याची आहे. ज्या काही चर्चा होत आहेत त्या मागच्या १२ वर्षांपासून केल्या जात आहेत. हे सरकार रामालाही सोडत नाहीये, त्या मंदिरातही भ्रष्टाचार झालाय. असाच कारभार झाला तर २०२९ मध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल. कारण यांच्या हातात अशीच सत्ता राहिली तर देव जाणे काय करतील असं म्हणत सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.
जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याच मान्य केले. मात्र, बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती. दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत राहिले असते की इंडिया सोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला आहे. दरम्यान एनडीएसह जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
