Vinod Tawde On Balasaheb Thackeray Sharad Pawar Relation: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले, महाराष्ट्रातील राजकारणात आता ‘हेल्दी रिलेशन्स’ आहेत हे म्हणायलाही जड जाते. यावेळी विनोद तावडे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राजकीय आणि वैयक्तिक नातेसंबंधावरही प्रकाश टाकला. विनोद तावडे यांनी ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतानाच्या अधिवेशनातील आठवणी जागवल्या.
महाराष्ट्रातील राजकारणात ‘हेल्दी रिलेशन्स’…
विनोद तावडे म्हणाले की, “राज्यातील राजकारणात ज्या प्रकारची हमरीतुमरी होती, सकाळी नऊ वाजता भोंगा वाजतो त्याला उत्तर दिले जात असे, ते पाहता महाराष्ट्रातील राजकारणात ‘हेल्दी रिलेशन्स’ आहेत असे म्हणायलाही आता दुर्दैवाने जड जाते. मी मागे सांगितले होते की, महाराष्ट्रात मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करायचो. अधिवेशन सुरू असताना जेवणाची सुट्टी झाली की मुख्यमंत्री आपल्या केबिनला जायचे, मी माझ्या केबिनला यायचो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शिपाई एक चिठ्ठी घेऊन यायचा. त्या चिठ्ठीमध्ये ‘तुमच्या वहिनींनी डबा पाठवलाय, जेवायला येता का?’ असे लिहिलेले असायचे आणि मी जेवायला जायचो. जेवण केल्यावर पुन्हा सभागृहात गेल्यावर भाषण सुरू करायचो आणि पुन्हा टीका करायचो.”
बाळासाहेब ठाकरे-शरद पवार संबंध
आपल्या भाषणात विनोद तावडे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील राजकीय आणि वैयक्तिक नात्यावर भाष्य केले. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर खूप टीका करायचे. पण ते एकमेकांसोबत सहकुटुंब जेवणही करायचे असे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे.”
