वाहनांवर दगडफेक, जाळपोळ, लाठीमार

धुळे , अमरावती: बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बुधवारी हाक दिलेल्या ‘भारत बंद’ला धुळे आणि अमरावती शहरात हिंसक वळण लागले.

धुळे शहरातील तिरंगा चौक, शंभर फुटीरोड, ८० फुटीरोड, चाळीसगावरोड या भागात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. वाहनांचे नुकसान आणि जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत दोन अधिकारी आणि १० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. शिरपूर शहरातही दोन बस आणि १० इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली.

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूराच्या नळकांडय़ा फोडल्या. तरीही जमाव हटत नसल्याने अखेर हवेत गोळीबार केला.

यवतमाळमध्ये बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या आंदोलकांवर एका व्यापाऱ्याने मिरची पूड फेकल्याने येथील मारवाडी चौकात काही काळ तणाव निर्माण झाला. दुपारी ३ वाजतानंतर विरोधक व समर्थक समोरासमोर आल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून  बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. दरम्यान येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या मारवाडी चौक, नेहरू चौक, इंदिरा गांधी मार्केट, सरदार चौक, नेताजी चौकातील व्यापाऱ्यांनी आमचे नागरिकत्व कायद्यास समर्थन आहे, आम्ही दुकाने बंद ठेवणार नाही, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती. तसे संदेशही मंगळवार दुपारपासूनच समाजमाध्यमांवर फिरत होते. आज सकाळी बाजारपेठ उघडल्यानंतर काही भागात आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासाठी बळजबरी केली असता एका मिरची व्यापाऱ्याने  दुकान बंद करण्यास नकार दिला. आंदोलकांनी दुकानाचे शटर जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न  करताच मिरची व्यापाऱ्यासह उपस्थित एका महिलेने आंदोलकांवर मिरची पूड फेकली.  यावेळी घटनास्थळी केवळ दोन पोलीस शिपाई तैनात होते. या गोंधळाबद्दल शहर पोलीस ठाण्यात कळताच ठाणेदार धनंजय सायरे हे  कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंदोलक पुढे निघून गेले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यास समर्थन देऊन बाजारपेठेत रॅली काढून दुकाने उघडली. दुपारी २ नंतर आंदोलक पुन्हा बाजारपेठेत आले व त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र समर्थक आणि विरोधक जुमानत नसल्याने गर्दीस पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गेल्या शुक्रवारी झालेल्या बंददरम्यानही याच भागात तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी बसस्थानक चौकात चक्काजाम केला.