राजारामबापू, क्रांती कारखान्याच्या ट्रॅक्टरला आगी लावण्याचे प्रकार

सांगली : एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून मध्यरात्री कार्यकर्त्यांनी राजारामबापू व क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या दोन ट्रॅक्टरला आगी लावण्याचे प्रकार घडल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच विश्वास कारखान्याचे वाहनही पेटविण्याचा प्रयत्न झाला तर विविध ठिकाणी वाहनांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्याचे प्रयत्न झाले.

राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील असून क्रांतीचे अध्यक्ष आ. अरूण लाड व विश्वासचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक आहेत. बडय़ा नेत्यांच्या कारखान्याची ऊस वाहतूक एकरकमी एफआरपीसाठी रोखण्याचे प्रयत्न स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केले. राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे, तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे गुरुवारी रात्री उशिरा पेटविण्यात आला.

तसेच विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच  पेटविण्याचा प्रयत्न झाला. एकरकमी एफआरपी मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी असून या मागणीला कोल्हापूर जिल्ह्य़ात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र सांगली जिल्ह्य़ात दालमिया व दत्त इंडिया हे दोन कारखाने वगळता प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानीचे कार्यकत्रे आक्रमक झाले आहेत. 

बुधवारी राजारामबापू कारखान्याच्या ३५ वाहनाची हवा सोडण्यात आली. यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगा व तालुक्यात रामपूर फाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली होती.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, जर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केल्याविना कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत. दत्त इंडिया व दालमिया खासगी असून एकरकमी देण्याचे मान्य करतात. मग इतकी वष्रे सहकारात साखर कारखाने चालू असताना शेतकऱ्यांचे पसे द्यायच्या वेळीच आíथक अडचणी का सांगितल्या जातात. हे कारखानदार शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करीत आले असून हे यापुढे सहन केले जाणार नाही.