Viral Mhatarichi Chul Travel Plan : सोशल मीडियावर सध्या ‘म्हातारीची चूळ’ (Mhatarichi Chul) या नैसर्गिक आश्चर्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. समुद्राच्या लाटा उसळल्यानंतर खडकांमधून पाण्याचे कारंजे उडतानाचे हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. कोकणात सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला एक नैसर्गिक चमत्कार आहे. तिथे कसे पोहोचायचे आणि मुंबईपासून त्याचे नेमके अंतर किती, याची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

निवती दीपगृहाजवळील (Lighthouse) एका मोठ्या खडकाला नैसर्गिकरीत्या भेग पडलेली आहे. समुद्राच्या लाटा जेव्हा वेगाने या भेगेत शिरतात, तेव्हा पाण्याचे उंच तुषार एखाद्या कारंज्यासारखे वर उडतात. अनेक पर्यटक इथे भेट देत असून अनेकजण याचे व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यामुळे तुम्हीही आता कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर इथे नक्की भेट द्या. इथं कसं पोहोचाल याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देतो.

निवतीला कसे पोहोचाल?

मुंबईहून कोकण रेल्वेने कुडाळ रेल्वे स्थानक गाठा. कुडाळ स्थानक निवतीपासून सुमारे २५ ते ३० किमी अंतरावर आहे. तिथून तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने निवतीला पोहोचू शकता. तुम्ही रस्तेमार्गे जात असाल तर, मुंबई-गोवा महामार्गाने (NH-66) कुडाळपर्यंत प्रवास करा. कुडाळ शहरात आल्यावर उजवीकडे वळून सुमारे २०-२५ किमी अंतरावर असलेल्या निवती बीचकडे जाता येते. मुंबई ते निवती हे अंतर साधारण ४५० ते ५०० किमी असून या प्रवासाला ९ ते ११ तास लागू शकतात. मुंबई-गोवा महामार्गाने (NH-66) कुडाळपर्यंत प्रवास करा. कुडाळ शहरात आल्यावर उजवीकडे वळून सुमारे २०-२५ किमी अंतरावर असलेल्या निवती बीचकडे जाता येते.

निवती ते म्हातारीची चूळ

‘म्हातारीची चूळ’ प्रत्यक्ष पाहण्यासाठी तुम्हाला निवती बीच किंवा देवबाग येथून बोटीने (Boat Ride) जावे लागते, कारण हे दृश्य समुद्रातील खडकांमध्ये पाहायला मिळते. भरतीच्या वेळी पाण्याचा कारंजा अधिक उंच उडताना दिसतो. इथपर्यंत जाताना तुम्हाला इतर अनेक नयनरम्य दृष्यही दिसतात. तुमचं नशिब चांगलं असेल तर तुम्हाला डॉल्फिनचंही दर्शन होऊ शकतं. येथील समुद्रसफारी इतकी नयनरम्य आहे की याला कोकणतलं मिनी बालीही म्हटलं जातं.