कराड : उत्सव आणि सण- समारंभांच्या नावाखाली सध्या ज्या पद्धतीचा कानठळ्या बसवणारा डीजे, प्राणघातक डॉल्बी, डोळे आंधळे करणारे लेझर लाईट्स आणि प्लाझ्माचा नंगानाच सुरू आहे, तो आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. हा केवळ उत्सवाचा उत्साह राहिलेला नसून, थेट नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. या सांस्कृतिक अधोगतीला आणि ध्वनीप्रदूषणाच्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी कराड आणि मलकापूरमधील सामाजिक संस्थांनी अखेर आक्रमक आणि परखड भूमिका घेत ‘डीजे- डॉल्बीमुक्त उत्सवा’चा खणखणीत निर्धार केला आहे.

येथील छत्रपती शिवाजी उद्यानात पार पडलेल्या चर्चासत्रात उपस्थित वक्त्यांनी प्रशासकीय हलगर्जीपणा आणि बेजबाबदार नागरिकांच्या मानसिकतेवर जोरदार आसूड ओढले. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र असो वा कोणत्याही धर्माचा सण—उत्सवाच्या आड डीजेचा भसाडा आवाज लावून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण आणि गरोदर महिलांच्या जिवाशी खेळण्याचा परवाना कुणालाही दिलेला नाही. लेझर लाईट्समुळे लोकांचे डोळे जाणे आणि मोबाईलचे सेन्सर जळणे, हा कसला आनंद? हा थेट सामाजिक आणि शारीरिक घातपात आहे.केवळ पोलिसांच्या नोटीसवर आणि कागदी कायद्यांवर अवलंबून न राहता, आता जनतेनेच या ‘ध्वनी- दहशतवादा’विरुद्ध उभे ठाकले पाहिजे. परंपरांच्या नावाखाली सुरू असलेला हा बीभत्स गोंधळ थांबवून पुन्हा एकदा ताशांचा कडकडाट, लेझीम, मृदंग, टाळ, अभंग आणि देशभक्तीपर गीतांचा निनाद घुमलाच पाहिजे! सण साजरे करायचे की आवाजाची विकृत स्पर्धा लावून लोकांना त्रस्त करायचे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

युवकांनीही हे लक्षात ठेवावे की, डीजेच्या तालावर नाचून स्वतःचे आरोग्य, आयुष्य आणि कायदेशीर भवितव्य उद्ध्वस्त करणे थांबवा. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे, पण तुमच्या उत्सवामुळे दुसऱ्याच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा हक्क कुणालाही नाही.
या ऐतिहासिक एल्गार परिषदेत छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रोटरी क्लब, एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, विजय दिवस समिती यांसह अनेक संघटनांचे पदाधिकारी आक्रमकपणे एकत्र आले. वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, प्रा.डॉ. बी.जे. पाटील, प्रा. जे.के. पवार आदी मान्यवरांनी आपल्या सडेतोड विचारांनी समाजातील या सडक्या मानसिकतेवर प्रहार केला. ए.आर. पवार यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. बी.एस. खोत यांनी भार मानले. कराड-मलकापूरची ही मशाल आता संपूर्ण महाराष्ट्रातील डीजे संस्कृतीची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही असा दावा या वेळी करण्यात आला.