सांगली : लोकसभा निवडणुकीत काहींनी मस्ती केली, आम्ही आमची ताकद दाखवली. आता तशी हिम्मत कोणी करणार नाही अशी बोचरी टीका करत आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी बुधवारी कॉंग्रेसच्या सृजन अभियान मेळाव्यात महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना इषारा दिला. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर खासदार, आमदार निवडून येतील त्यांनी यावेळी सांगितले.
सांगलीत काँग्रेसच्या संघटन सृजन मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे तेलंगणाचे नेते थोटा लक्ष्मीकांत राव, खासदार प्रणिती शिंदे, दीप्ती चौधरी त्याच बरोबर जिल्हातील नेते उपस्थित होते. यावेळी आ. कदम यांनी बोलताना अप्रत्यक्ष महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना टोला लगावताना सांगितले, मागील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी खूप मस्ती केली. पण ती मस्ती फार काळ टिकली नाही आम्ही आमची ताकद दाखवून दिली आणि आपला खासदार निवडून आणला. आता खासदार विशाल पाटील आणि मी जनतेच्या साक्षीने वाही देतो की २०२९ च्या निवडणुकीत लोकसभा काँग्रेसच्या चिन्हावर जिंकणारच. विधानसभा निवडणुकीत देखील सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार जिल्ह्यातून निवडून येतील.
पुढे बोलताना ते म्हणाले, अनेक आव्हाने आमच्यासमोर होती पण आम्ही विचारांशी कधी तडजोड केली नाही. त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेत आम्हाला मोठे यश मिळाले. महापालिकेत तर आमच्या पुढे असणारे उमेदवार बलाढ्य होते तरी देखील आमचे उमेदवार निवडून आले. आपल्याला फक्त आत्मविश्वास पाहिजे. आम्हाला सत्ताधारी लोकांकडून खूप त्रास होतो, पण आम्ही कधी विचारांची तडजोडी केली नाही.
यावेळी बोलताना खा. श्रीमती शिंदे म्हणाल्या, सध्या देशात महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांचा वापर केला जातोय. महिलांना तुच्छ समजले जातेय. जिथे त्यांची सत्ता नाही त्याठिकाणी जागा कमी होणार आहेत आणि त्याची सत्ता जिथे आहे तिथे जागा वाढणार आहेत. यासाठी महिला आरक्षणाचा वापर केला जाणार आहे . तामिळनाडू, पश्चिम बंगालची निवडणूक असल्यामुळे हे महिला आरक्षण आणत आहेत. खरेतर आधीच हे विधेयक आणायला हवे होते.
काँग्रेस पक्षात उंटावरून शेळ्या राखण्याचं काम केले जात नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते हे तळागाळात जाऊन काम करत आहेत. देशात सध्या संवाद होत नाही, सगळे एकतर्फी काम चालू आहे. विधानसभा, लोकसभा मधील पराभव अपेक्षित नव्हता, तरीही सर्वसामान्य लोक आपली वाट पाहत आहेत, लोकांच्या मध्ये जाऊन त्याची समस्या जाणून घेण्याची हीच वेळ आहे, असेही खा. शिंदे म्हणाल्या.
