सांगली : काही प्रस्थापित केवळ सत्तेसाठी काँग्रेसबाहेर जात असले तरी सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आपण महापालिका निवडणुक लढविणार असून महापालिकेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मंगळवारी सांगलीत व्यक्त केला. उद्यापासून महाविकास आघाडीतून निवडणुक लढवू इच्छिणार्यांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक आणि महापालिका निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांचा पदग्रहण समारंभ आज काँग्रेस समितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कदम बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, डॉ. जितेश कदम, अय्याज नायकवडी, सुभाष खोत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कदम म्हणाले, महाविकास आघाडी या निवडणुकीत सक्षम आणि सामान्य माणसात कार्यरत असलेल्यांना उमेदवारी देणार आहे. काँग्रेसने अनेकांना पदे दिली. संधी दिली ती माणसे आज केवळ सत्तेसाठी दुसरीकडे जात असली तरी सामान्य मतदार आजही आमच्या विचारांचा आहे. उमेदवारी देत असताना निकष पाळले जातील, त्यामुळे काहींना बाजूला ठेवले जाईल, मात्र, दोन पावले मागे पुढे करावेच लागेल.
महापालिकेच्या निवडणुकीत सामान्य मतदार आमच्यासोबत असल्याने महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के येणार आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या एकत्रित मुलाखती उद्या दिवसभरात घेतल्या जातील. यानंतर दोन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल.
यावेळी बोलताना खासदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणुका महाविसकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढविल्या जातील. जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत जाणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. शहर जिल्हाध्यक्ष निवडताना आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला असून कुणीतरी अफवा पसरवून आमच्यात मतभेद होते अशा चुकीच्या संदेशाला बळी न पडता ही निवडणुक एका विचाराने आमदार डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली आपणाला जिंकायची आहे.
