राहाता: खरा महाराष्ट्र कळावा म्हणून पालकांनी धाडसी निर्णय घेऊन मुलांना मराठी शाळेत पाठवावे व प्रत्येकाने मराठीकडे लक्ष द्यावे, मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालये ही मराठीची खरी वस्त्र आहेत, मराठी शाळा अजूनही सुधारू शकतील मात्र त्यासाठी धाडसाने निर्णय घ्यायला हवेत, असा आशावाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केला.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त प्रवरानगर येथे आज, गुरूवारी राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचे वितरणप्रसंगी पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार मोनिका राजळे, काशिनाथ दाते, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, संग्राम जगताप, अमोल खताळ, प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, शालिनी विखे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध आणि सुजलाम करायचे असेल तर, मायमराठीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. यासाठी मराठी शाळा महत्त्वाच्या आहेत. भाषा शिकणे म्हणजे तंत्र आहे, कारण भारतामधील ९८ शास्त्रज्ञ हे मराठीतून शिकले आहेत. इंग्रजी शाळा या सोन्याच्या पिंजऱ्यात वाढलेले पोपट आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा या गरुडासारखी झेप घेऊन उंच भरारी घेत आहेत. कधीतरी या मराठी शाळांना भेट द्या, कारण ही आपली खरी मंदिरे आहेत. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. मराठी शाळा अजूनही सुधारू शकतात, मात्र यासाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल. तुमच्या खांद्याववर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा, असे आवाहन करत त्यांनी मराठी शाळेतील मुलामुलींच्या स्वच्छतागृहांची बसस्थानकपेक्षाही दुर्दशा झाली आहे. त्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विखे-पाटील साहित्य पुरस्काराचा गौरवपूर्ण उल्लेख करून पाटील म्हणाले, सहकाराच्या भूमीतील मातीने हा परिसर ऐतिहासिक केला आहे. या जिल्ह्याचा इतिहास महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिकच आहे. येथील मातीशी खूप जुने नाते आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्व. आप्पासाहेब पवार यांचा उल्लेख करून, येथील वटवृक्षाशी आमचे भावनिक, जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे, असे सांगत जुन्या आठवणींना ऊजाळा दिला. विठ्ठलराव विखे-पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत आहे. आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि कलाकारांच्या सन्मानाने पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे. लेखकांमधील संवेदनशील शक्ती आणि माणुसकीची जाणीव साहित्य समृद्ध करीत आहे.
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविकपर भाषणात मंत्री विखे यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्य पुरस्कारांच्या वाटचालीचा आढावा घेत, या पुरस्काराने सन्मानित झालेल्या साहित्यिकांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, हा खरा आमचा अभिमान आहे, असे सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती दोन्ही परिवारांचा ऋणानुबंध अधिक दृढ करणारी आहे. स्व. अजितदादांशी असलेले नाते आपल्या माध्यमातून भविष्यातही कायम राहील; आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका असेल, असे मंत्री विखे म्हणाले.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुरस्कारची घोषणा केली. यंदा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ उत्तम कांबळे (नाशिक) यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ संहिता राजन (पुणे), विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर (पुणे), कलागौरव पुरस्कार’ तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार (नारायणगाव), नाट्यसेवा पुरस्कार’ सचिन शिंदे (नाशिक), समाजप्रबोधन पुरस्कार मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस, अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार निवृत्ती जोरी (संगमनेर) व प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार’ संजय गोर्डे (संगमनेर) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सुजय विखे यांनी अभार मानले.
