“छत्रपती शिवाजी महाराजांनी जनसामान्यांत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. त्यांच्या युध्द कौशल्यासमोर मुघलांची विशाल सेनाही अपुरी पडली. शौर्याच्या जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि विस्तारही केला. १७ व्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दूरगामी प्रभाव टाकणारे निर्णय घेतले. भारताच्या पहिल्या नौदलाची पायाभरणी त्यांच्याच कार्यकाळात झाली. छत्रपतींचा समाज सुधारणेचा हा वारसा नंतरच्या काळात समाजसुधारकांनी पुढे नेला,  त्यामुळे रायगडाला भेट देणे हे माझ्यासाठी तीर्थयात्रेप्रमाणे आहे.”, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज रायगडावर काढले.

   राष्ट्रपती कोविंद यांनी सोमवारी सपत्निक किल्ले रायगडाला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

     या वेळी  किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचेही राष्ट्रपतींनी कौतुक केले. या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची अनुभूती २१ व्या शतकातही गडावर येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांना घेता येईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.   
   दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राष्ट्रपती भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेतला. राजसदरेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. या वेळी त्यांना भवानी तलवार, दांडपट्टा, आज्ञापत्र आणि शिवकालीन होण याची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. यानंतर राष्ट्रपतींनी होळीच्या माळावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि चार वाजता मुंबईकडे ते रवाना झाले.