सांगली : परप्रांतिय मजूराच्या हत्येचा प्रकार घडून  २४  तास उलटण्यापुर्वीच एका विवाहित महिलेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी विट्यात समोर आली. परप्रांतिय मजूराच्या खूनप्रकरणी संशयिताला पोलीसांनी अटक केली असून महिलेचा खून झाल्यानंतर पती बेपत्ता झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सलग दोन खूनाचे प्रकार घडल्याने विटा शहरात खळबळ माजली आहे.

रविवारी दुपारी कार्वे (ता. खानापूर) येथे बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून बोअरवेल मशिन चालक रोशन यशवंत चौहान (वय २७) यांने मदतनीस विजय माणिक पानसे (वय २६) याचा चाकूने भोकसून खून केला आहे. दोघेही मध्यप्रदेशमधील असून एकमेकाचे नातलग आहेत. काल दुपारी जेवणासाठी झाडाखाली बसल्यानंतर दोघामध्ये वाद झाला. यावेळी पानसे यांने चौहान यांच्या बहिणीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कांदा कापण्याच्या सूरीने पानसे याच्यावर वार केला. यात पानसे हा जागीच ठार झाला. संशयित चौहान याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आज पहाटे काजल उर्फ श्रध्दा अविनाश लोटके (वय २३), या महिलेचा  लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी विटा शहरात उघडकीस आली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले असून मृत महिलेचा पती अविनाश लोटके हा फरार झाला आहे.

काल रात्री पती-पत्नी अष्टमी यात्रेसाठी गेले होते. परतत असताना दोघामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या वादात घरी आल्यानंतर पत्नीवर लोखंडी सळीनेवार केले. यानंतर तीन वर्षाच्या  मुलाला मित्राकडे सोडून पत्नी न सांगता कुठे बाहेर गेल्याचे सांगून पती फरार झाला. मित्राने घरी जाउन पाहिले असता काजल मृतावस्थेत आढळल्याने खूनाची घटना समोर आली.  

दोघांचाही चार वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगा आहे. खूनाची घटना समोर आल्यानंतर मृत महिलेच्या मावशीने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फरार अविनाश लोटके याचा पोलीस शोध घेत आहेत.