सांगली : मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून विट्यात कार्यालय व घरावर हा करून संगणकासह मोटारीची मोडतोड करण्याचा प्रकार विट्यात घडला असून या प्रकरणी अनोळखी चौघासह चार जणाविरूध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाकडून झाल्याचा दावा तक्रारदारांने केला असून आ. पडळकर यांची माफी माग अशी मागणी मोबाईलवरून करण्यात आली होती असेही फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आमदार जयंत पाटील यांचे समर्थक महेश कुपाडे यांचे विट्यात वेंकटेश्‍वरा ट्रॅव्हल्स बुकिंगचे कार्यालय आहे. कुपाडे यांनी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसवर आक्षेप घेणारा फोन मोबाईलवर आला. यावेळी स्टेटसमध्ये  कुणाचेही नाव नसल्याने मी माफी मागणार नाही असे सांगितले. यानंतर दुपारी साडेचार वाजणेच्या सुमारास तोंड झाकून आलेल्या चार अनोळखी तरूणानी हॉकी स्टिकने कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाच्या दर्शनी काचेची तोडफोड करून कार्यालयातील संगणकाची व वातानुकलित यंत्रणेची मोडतोड केली. याबाबत विटा पोलीस  ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यास गेले असताना घरासमोर असलेल्या मोटारीवर मद्याच्या बाटल्या फेेकून मारण्यात आल्या. यामध्ये मोटारीच्या काचा फुटल्या असून या हल्ल्यात सुमारे तीन ते चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत रात्री उशिरा विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोन व्यक्तीसह चार अनोळखी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयावरील हल्ल्याचे चित्रीकरण कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये झाले असून हल्लेखोराकडून करण्यात येत असलेली मोडतोड दिसत आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.