पंढरपूर : येथील श्री विठ्ठल मंदिर दि २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत दर्शनासाठी (मुख दर्शन व पदस्पर्श) बंद राहणार आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या जतन -संवर्धनासाठी वज्रलेप करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्तिसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे संवर्धन केले जाणार आहे. त्यामुळे तीन दिवस दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची मूर्तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मूर्तीची ही वज्रलेप प्रक्रिया केली जाते. यापूर्वी सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचा वज्रलेप करण्यात आला होता. मागील प्रक्रियेस सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तींची नियमित देखभालीच्या अनुषंगाने हे काम पुन्हा देण्यात येणार आहे. मात्र या वेळी ही प्रक्रिया करताना सुरुवातीला वारकरी, देशातील विविध मंदिरांतील तज्ज्ञ मंडळींनी वज्रलेप प्रक्रियेला विरोध केला. त्यानंतर येथील गणेश लंके व इतर या याचिकाकर्त्यांनी दिवाणी न्यायालय, पंढरपूर येथे दावा दाखल केला. यामध्ये न्यायालयाने स्थगिती दिल्याने वज्रलेपाचे काम करता आले नव्हते. त्यानंतर जिल्हा न्यायालय, सोलापूर व उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ कोल्हापूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने घेतलेल्या भूमिकेला ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या अंतिम आदेशाद्वारे महत्त्वपूर्ण न्यायालयीन अधिमान्यता दिली. मात्र, आषाढी यात्रा आल्याने ही प्रक्रिया करता आली नाही.

या संदर्भात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्या समवेत मंदिर समितीची दि. १३ सप्टेंबर रोजी दूरदृष्यप्रणाली द्वारे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत मंदिर समितीचे सदस्य, तसेच कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे (एएसआय) उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी, मंदिर समितीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत लेपन प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली.

विठ्ठलाचे दर्शन किती दिवस बंद?

विठ्ठल व रखुमाईच्या मूर्तीच्या लेपन प्रक्रियेला २२ सप्टेंबरला देवाची दर्शनाची वेळ झाल्यावर म्हणजे रात्री लेपनाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढे २३, २४ आणि २५ सप्टेंबर असे तीन दिवस ही प्रक्रिया करणार आहे. या तीन दिवसांत देवाचे मुख व पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी बंद ठेवणार आहे. पुढे २६ सप्टेंबरपासून पूर्ववत दर्शन सुरू राहील.

देवाच्या मूर्तींच्या संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले आहे. संबंधित सक्षम प्राधिकरणांच्या मान्यता आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मूर्तींच्या प्राचीन स्वरूपाला, पावित्र्याला किंवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेत भाविकांच्या श्रद्धेचा नितांत आदर राखून पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येईल.- डॉ. विलास वाहणे,सहा. संचालक, पुरातत्त्व विभाग, पुणे</strong>