राज्याचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा करण्यात आली. पहाटे २.३० वा. ही मानाची पूजा करण्यात आली. यावेळी सरकारचा प्रतिनिधी म्हणून एकनाथ खडसे सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी लीन झाले.

कार्तिकी एकादशीला पंढपुरात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची आरती करण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा नवे सरकार सत्तेत आल्याने अद्याप उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे हा मान साहजिकपणे मुख्यमंत्र्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता होती. त्यानुसार आज होणाऱ्या पुजेसाठी विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगेंनी नव्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रणही दिले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी औदार्य दाखवत त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांना हा मान बहाल केला.
दरम्यान, रुक्मिणीची पूजा मंदिर समितीचे सदस्य जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडली. कार्तिकी एकादशीनिमित्ताने आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.