पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे MPSC चे प्रमुख विवेक भीमनवार यांना पदावरून हटवण्याची. आता रोहित पवार यांनी हा दावा केला आहे की विवेक भीमनवार यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी फक्त इगोमुळे त्यावर काही निर्णय घेतलेला नाही. विवेक भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत. त्यामुळे मित्राला वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत असंच म्हणावं लागेल असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार यांनी काय म्हटलं आहे?

परवा संध्याकाळी विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे भीमनवार यांनी राजीनामा देऊन काही होणार नाही त्यांनी तो राज्यपालांकडे पाठवायला हवा होता. जो काही निर्णय आहे तो मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भीमनवार यांनी टाकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेच वाटतं की भीमनवार यांचा राजीनामा घेतला तर उद्या कुणाचाही राजीनामा मागितला जाईल, उद्या आपलाही राजीनामा मागितला जाईल त्यामुळे हा सगळा इगोचा खेळ झाला आहे. एकीकडे मित्राला वाचवायचं आहे दुसरीकडे आपला इगो मुख्यमंत्र्याना सांभाळायचं आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. त्यांची स्वप्नं का मारली जात आहेत? तर मुख्यमंत्र्यांच्या इगोमुळे आणि भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत त्यामुळेच. असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा का पाठवला?

विवेक भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा का पाठवला माहीत नाही कारण त्यांनी तो राज्यपालांना पाठवणं अपेक्षित होतं. पण मित्रच मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर भीमनवार यांनीही खेळी खेळली असावी. मी यामध्ये नाही, तुम्हाला मला वाचवायचं आहे असं म्हणत भीमनवार यांनी ही खेळी खेळली असावी. आता लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य महत्त्वाचं आहे की इगो आणि मित्र महत्त्वाचा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवायचं आहे असंही रोहित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर प्रेशर वाढवण्याचं काम हे भीमनवार करत आहेत तसंच त्यांनी राजीनामा दिलाय ही बातमी खरी आहे आणि आतली बातमी असली तरीही ती आम्हाला समजली आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्यात निर्णय झाला तर ठीक आहे नाहीतर पुणे बंद करणार असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.