एमपीएसी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी रात्री दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही तत्वतः हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केलं. यानंतर एमएपीएससी आंदोलनाचा चेहरा झालेला विवेकानंद पाटील या पठ्ठ्याने खणखणीत भाषण केलं.

काय म्हटलं आहे विवेकानंद पाटीलने?

युद्धातही आपल्याला जिंकायचं आहे आणि तहातही जिंकायचं आहे. विवेक भीमनवार यांच्यावर कारवाई होणारच हे लक्षात ठेवा. विवेक भीमनवार हे उद्या माझ्याकडे येणारच आहेत, कारण गर्दीला चेहरा नसतो. आंदोलन मागे घेतलं आहे का? मी भीमनवार जाईपर्यंत मी इथेच जातो आहे. विवेक भीमनवार जाणार ते ऐकत असतील तर त्यांनीही ऐकावं असंही विवेकानंद पाटील याने म्हटलं आहे. सरकारशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की सरकारच्या मनात काय आहे. रणांगणातून आपण माघार घेतलेली नाही. दुसऱ्या ठिकाणी मोर्चा घेऊन जायचं तर तिकडे जाऊ. सरकारसह चर्चेची दारं उघडी ठेवावी लागतात. कृष्णही शिष्टाई करायला कौरवांच्या दरबारात गेला होता. तसंच आम्हालाही जावं लागेल सरकारच्या दरबारात असं विवेकानंद पाटीलने म्हटलं आहे.

नवनाथ बनला सांगो, आम्ही वाघ आहोत गाढव नाही-विवेकानंद पाटील

मी नवनाथ बनला सांगेन, आम्ही वाघ आहोत, गाढव नाहीत, शिकार केलेय. कोणाच्या पण नादाला लागायचं, आमच्या नादाला लागायचं नाही, असा सणसणीत टोलाही विवेकानंद पाटील यांनी यावेळी लगावला. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. ११ दिवसांनी का होईना त्यांनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतला. शिवेंद्रराजे भोसले यांचेही आम्ही आभारी आहोत. आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. आम्ही चौकशीसाठी सरकारला ६० दिवस मुदत दिली आहे. तोपर्यंत विवेक भीमनवार हे पदावर नसतील. त्यांनी आता आयुष्यभरासाठी सुट्टी घ्यावी, असेही विवेकानंद पाटील यांनी म्हटलं आहे.

११ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन स्थगित

११ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यातील एस एम जोशी पुलावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. रविवारी रात्री शिवेंद्रराजे भोसले हे सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांशी मध्यस्थी करायला पोहोचले होते. त्यानंतर तब्बल तीन तास शिवेंद्रराजे भोसले आणि विद्यार्थ्यांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. सुरुवातीला विवेक भीमनवार यांचा राजीनामा वगळता सर्व मागण्या केल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर केले. मात्र, विद्यार्थी भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे ते आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. अखेर रात्री १ वाजून २४ मिनिटांनी विवेक भीमनवार यांनी ट्विट करुन आपण पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले. हे म्हणजे सरकारने भीमनवार यांना एकप्रकारे सक्तीच्या रजेवर पाठवण्यासारखे होते. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आंदोलन स्थगित केले.

एमपीएससी आंदोलकांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या?

आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली
चौकशी होईपर्यंत अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन
तीन वर्षात ७० हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
२०२७ मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही
तहसीलदार भरतीत ६०-४० ऐवजी ५०-५० चा रेशो
आयोगाची सदस्य संख्या ११ पर्यंत वाढवली जाणार
एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य