Vivekananda Patil reply troll statement : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या परीक्षांतील पेपरफुटीमुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे. अनेक राजकीय नेतेमंडळींनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून रोहित पवारही त्यांच्याबरोबर सातत्याने उपस्थित राहून आंदोलन करत आहे. या आंदोलनातून विवेकानंद पाटील या तरुणाची महाराष्ट्रभर चर्चा होत असून त्याच्या कविता, भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र काल दिवसभर तो त्याच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलही झाला. या ट्रोलवरही त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.

विवेकानंद पाटील याची भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्याच्या चाहता वर्ग तयार झाला. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या विवेकानंद पाटीलविषयी अनेकांना जिव्हाळा वाटू लागला. त्यामुळे त्याच्या घराचे व्हिडिओही समोर आले. विविध स्पर्धांमध्ये जिंकलेल्या ट्रॉफी त्याच्या घरात होत्या. त्यामुळे त्याला चांगलं घर बांधून देण्याचं आश्वासन काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केलं. तसंच, महाराष्ट्रभरातून विवेकानंद पाटीलला मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र, विवेकानंद पाटीलने ही मदत नाकारली.

परिस्थितीचं भांडवल करू नका

“मी २४ वर्षांचा तरुण आहे. माझ्यात अजूनही धमक असून मी लाथ मारेन तिथे पाणी काढू शकेन असं म्हणत माझ्या परिस्थितीचं भांडवल करू नका”, असं विवेकानंद पाटील म्हणाला. यावरून त्याला दिवसभर ट्रोल केल्याचा दावा विवेकानंदने केला. विवेकानंदला त्याच्या आई-वडिलांची काळजी नाही, म्हणून त्याने मदत नाकारल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र, ट्रोलर्सवर विवेकानंदने अत्यंत विवेकाने उत्तर दिलं. काल रात्री तो आंदोलनस्थळी राजकीय नेत्यांच्या भाषणानंतर बोलत होता. यावेळी रोहित पवार, आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

विवेकानंद म्हणाला, “अनेक लोकांना वाटतं की आमचं आमच्या आई-वडिलांवर प्रेम नाही. इतकं गलिच्छही राजकारण नसावं. मी काल सांगितलं की माझ्या परिस्थितीचं भांडवल केलं जाऊ नये. माझ्या मनगटात अजूनही रग आहे, मी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मातीत जन्माला आलो आहे. पण काही जणांनी वाईट पद्धतीने ट्रोल केलं. माझ्या आईचा, घराचा फोटो पाहिला. पुण्यात अभ्यास करतो, आई-वडिलांकडे लक्ष नाही, असं अनेकांनी म्हटलं.”

मी झोपताना मज राबणारी माय दिसते

पुढे काव्यात्मक पंक्तीत तो म्हणाला, “कोणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कोणाला रंभा, उर्वशी, अप्सरा दिसते. नव-नाटकी लोकांना काय काय दिसते. मी झोपताना मज राबणारी माय दिसते.” त्याच्या या काव्यात्मक पंक्तीनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडकटाने त्याचं कौतुक केलं.