लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची मंगळवारी सांगलीत रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मिरवणुकांवर बंदी घालण्याबरोबरच मद्यविक्रीही बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी मंगळवारी रंगीत तालीम झाली, त्या वेळी मतमोजणी कर्मचा-यांशी बोलताना सांगितले.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी (निवडणुक) श्रीम. मौसमी बर्डे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतमोजणीच्या रंगीत तालमीची सविस्तर माहिती दिली.
श्री. कुशवाह पुढे म्हणाले, मतदान प्रक्रिया योग्यरीत्या पार पडली आहे. आता मतमोजणी प्रक्रिया व्यवस्थित व शांततेत पार पाडणे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे. मतमोजणीसाठी नियुक्ती केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले असून या प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. या मतमोजणी केंद्रात जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय ६ विभाग करण्यात आले आहेत व एक टपाली मतमोजणी विभाग असे एकूण सात विभाग करण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेल्या विभागामध्ये प्रत्येकी १६ टेबल लावण्यात आली आहेत. या टेबलावरूनच मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचा-यांनी सकाळी ६ वाजता नियुक्त केलेल्या ठिकाणी वेळेत हजर राहावे. मतमोजणीचे कामकाज काळजीपूर्वक व शांततेने करावे. मतमोजणीच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी करीत असलेल्या कामाचे व्हिडीओ छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे.
मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामकाज करावे. उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधीनीं त्यांना काही शंका असल्यास त्या त्वरित संबधित अधिका-यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्यांच्या शंकांचे निरसन तात्काळ त्याच ठिकाणी करण्यात येईल. मतमोजणी केंद्रात प्रमुख अधिकारी वगळता इतर सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच मतमोजणीसाठी नियुक्त इतर कर्मचारी वर्गाला मतमोजणी केंद्रात मोबाइल आणता येणार नाहीत. संबंधितांनी मोबाइल आणल्यास ते त्वरित जप्त करण्यात येतील व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
शेवटी ते म्हणाले, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणीसाठी असलेल्या सर्वाची चहा, नाश्ता, जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात येणार आहे. मतमोजणी दिवशी सकाळी ७ वाजता संबंधितांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मतमोजणीची प्रक्रिया आनंदी वातावरणात व शांततेत पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी त्यांनी केले.
या रंगीत तालमीच्या वेळी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे खाते प्रमुख मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2014 रोजी प्रकाशित
सांगलीत मतमोजणीची रंगीत तालीम
लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची मंगळवारी सांगलीत रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मिरवणुकांवर बंदी घालण्याबरोबरच मद्यविक्रीही बंद ठेवण्यात येणार आहे.

First published on: 14-05-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vote counting rehearsal in sangli