Voter List Name Check guide for Election Commission Door to Door Verification: निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंड या राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तुमच्या थेट घरी येऊन मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत.
ही मोहीम पुढील महिनाभर म्हणजेच ३० जून ते २९ जुलै या कालावधीत चालणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादी अचूक करणे हा आहे. यामध्ये सर्व पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जातील आणि अपात्र किंवा बोगस नावे यादीतून वगळली जाणार आहेत
महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
३० जून ते २९ जुलै: बीएलओ (BLO) घरोघरी जाऊन माहिती अर्ज देणे आणि गोळा करणे.
५ ऑगस्ट: प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध होणार.
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: मतदार यादीतील नावांवर हरकती आणि दावे नोंदवण्याची मुदत.
७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध होणार.
मतदारांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे (FAQ)
या मोहिमेबाबत सामान्य मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार त्या सर्व शंकांचे निरसन खालीलप्रमाणे आहे:
१. माझे नाव आधीच मतदार यादीत आहे, तरीही मला काही करावे लागेल का?
उत्तर: होय. जेव्हा बीएलओ तुमच्या घरी येतील, तेव्हा तुम्हाला माहिती अर्ज भरावा लागेल. या फॉर्मची एक प्रत बीएलओकडे जमा करून दुसरी पोहोच पावती (Acknowledgement) स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.

२. बीएलओ घरी आल्यावर कोणतेही दस्तऐवज जमा करावे लागेल का?
उत्तर: नाही. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, हा माहिती अर्ज भरताना तुम्हाला कोणत्याही ओळखपत्राची (उदा. आधार, पासपोर्ट किंवा इतर कागदपत्रे) प्रत जोडण्याची किंवा जमा करण्याची अजिबात गरज नाही.
३. बीएलओ घरी आले तेव्हा घर बंद असेल तर काय होईल?
उत्तर: जर तुमचे घर बंद असेल, तर बीएलओ तिथे माहिती अर्ज ठेवून जातील. हा भरलेला अर्ज गोळा करण्यासाठी ते पुढील काही दिवसांत किमान ३ वेळा तुमच्या घरी भेट देतील.
४. बीएलओची वाट न पाहता ऑनलाईन फॉर्म भरता येईल का?
उत्तर: होय. जर तुम्हाला बीएलओची वाट पाहायची नसेल, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने देखील हा फॉर्म भरू शकता.
५. जुन्या मतदार यादीतील तपशील आठवत नसेल तर काय करावे?
उत्तर: तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक, तुमचे नाव किंवा मतदान केंद्राच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुमचा जुना तपशील सहज शोधू शकता.
६. लग्नानंतर नाव बदलले असल्यास कोणाचा तपशील द्यावा?
उत्तर: जर मागील पडताळणीत तुमचे नाव समाविष्ट नसेल आणि तुमचे लग्न झाले असेल, तर फॉर्ममध्ये सासरच्या लोकांऐवजी तुमच्या आई-वडिलांचा किंवा आजी-आजोबांचा (माहेरचा) तपशील देणे आवश्यक आहे.
अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा?
तुमच्या मतदार यादीतील तपशिकात काही चूक आढळल्यास किंवा नोंदणीबाबत काही शंका असल्यास, तुम्ही निवडणूक आयोगाच्या १९५० (1950) या टोल-फ्री मतदार हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता. याशिवाय जवळच्या मतदार केंद्राला किंवा जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट देऊन मदत घेता येईल.
