मुंबई : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ रविवार, २६ एप्रिलपासून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. १३ दिवसांच्या ८ मेपर्यंत चालणाऱ्या या अभ्यास दौऱ्यात प्रतिनिधी मंडळ ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया (एसआरए) या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे.
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात व्हीएसआयच्या नियामक मंडळाचे सदस्य बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह डॉ. अशोक कडलक (मुख्य शास्त्रज्ञ : पीक उत्पादन आणि संरक्षण), डॉ. कपिल सुशील (मुख्य शास्त्रज्ञ : ऊस प्रजनन विभाग), तसेच डॉ. अशोक जगताप (शास्त्रज्ञ : रेणुजीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी विभाग) सहभागी झाले आहेत. या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील ऊस शेतीसाठी नवे तंत्रज्ञान, सुधारित ऊस वाण, साखर उतारा वाढविण्याच्या पद्धती आणि आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया ही संस्था ऑस्ट्रेलियातील ऊस उद्योगासाठी संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान प्रसाराचे महत्त्वपूर्ण काम करते. उत्पादकता, नफा आणि शाश्वतता वाढविण्यावर या संस्थेचा विशेष भर असून नवीन ऊस जाती विकसित करणे, कीड आणि रोग व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, स्मार्ट शेती आणि शाश्वत कृषी पद्धती यामध्ये ही संस्था आघाडीवर आहे. या भेटीदरम्यान ऊस पिकाची उत्पादकता आणि साखर उतारा वाढविणे, स्पीड ब्रीडिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदलास प्रतिकार करणाऱ्या ऊस जातींचा विकास, कीड व रोग व्यवस्थापनातील आधुनिक उपाययोजना, तसेच मिलिंग आणि प्रोसेसिंग तंत्रज्ञानातील सुधारणा या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियामध्ये ऊस संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि शेतस्तरीय प्रयोग यांचा प्रभावी समन्वय केला जातो. संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची ही यंत्रणा महाराष्ट्रासाठीही आदर्श ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या दौऱ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. हा करार झाल्यास संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञान देवाणघेवाण, शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण आणि सुधारित ऊस वाणांच्या विकासासाठी मार्ग मोकळा होणार आहे.
