मुंबई – अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे झालेल्या अपघाताची नियमांनुसार चौकशी सुरू आहे. विमान अपघात तपास संस्थेचा (एएआयबी) तपास हा तांत्रिक आणि पुराव्यांवर आधारित आहे. या अंतर्गत विमानाचे अवशेष, कार्यान्वयन आणि देखभाल दुरुस्तीच्या नोंदींची पद्धतशीर तपासणी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (आयसीएओ) मानकांनुसार, घटनेच्या ३० दिवसांच्या आत एक प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर योग्य वेळी अंतिम अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती नागरी हवाई मंत्रालयाने दिली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, याआधीच्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या पत्रकाला अनुसरून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने बारामती येथे झालेल्या लिअरजेट ४५ च्या (व्हीटी – एसएसके) अपघाताची चौकशी ‘विमान अपघात तपास संस्थेमार्फत (एएआयबी) विमान (अपघात व इतर दुर्घटनांसंबंधित तपास ) नियमावली २०२५ नुसार चौकशी सुरू आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर अस्तित्वात होते. एल – तीन कम्युनिकेशन्स या कंपनीने उत्पादन केलेल्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) मधील माहिती एएआयबीच्या नवी दिल्लीतील कार्यालयात यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आली आहे. उच्च तापमानामुळे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरचे (सीव्हीआर) मोठे नुकसान झाले आहे. त्याचे उत्पादन हनीवेल कंपनीने केले असल्याने त्यांच्या कडून तांत्रिक साहाय्याची मागणी केली आहे.

२०२५ या वर्षात, नागरी विमान वाहतूक महा संचालनालयाने (डीजीसीए) बिगर सूचित विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांची ५१ नियामक लेखापरीक्षणे केली आहेत. या व्यतिरिक्त, मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीची अनेक वेळा उड्डाण सुरक्षा प्रणाली, उड्डाण कर्तव्य वेळेची मर्यादा, देखभाल नियमांचे पालन, दस्तऐवजीकरण आणि विमानतळ सुविधा या सारख्या विविध बाबींशी निगडीत तपासणी करण्यात आली आहे. तपासनीत आढळलेल्या सर्व बाबींची दखल घेण्यात आली आणि ते पूर्ण करण्यात आत्या आहेत.

अपघातानंतरचे विशेष ऑडिट

अपघातानंतर मंत्रालयाने डीजीसीएला, नियामक अनुपालन, ऑपरेशनल कंट्रोल सिस्टम, देखभाल पद्धती, कर्मचारी प्रशिक्षण मानके, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली तसेच सीव्हीआर/एफडीआर देखरेखीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी, मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे निर्देश दिले आहेत. हे परीक्षण ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाले असून, लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. निष्कर्षांचा आढावा घेऊन डीजीसीएच्या अंमलबजावणी धोरण आणि कार्यपद्धती मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. या शिवाय, मंत्रालयाने डीजीसीएला व्हीआयपी/व्हीव्हीआयपी सेवांमध्ये असलेल्या इतर प्रमुख नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्स आणि विमानतळांचेही विशेष लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे. ही निरीक्षणे टप्प्याटप्प्याने केली जात असून, आवश्यकतेनुसार योग्य अंमलबजावणी कारवाई केली जाईल.