संगमनेर: कर्करोगासारखे दुर्धर आजार केवळ एका मंत्राने बरा करणारा, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मुलं होण्याचे आमिष दाखवणारा, घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे चुटकीसरशी बऱ्या करणाऱ्या, हे सर्व उपचार करण्यासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथल्या भोंदूबाबाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बाबाचे चालू असलेले कारनामे आता पोलीस तपासात समोर येणार आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वडगाव पान येथील भोंदूबाबा विरुद्ध फिर्याद नोंदवली. त्यानुसार भोंदू राजेंद्र बापू गडगे (रा. वडगावपान, ता. संगमनेर) याच्यासह पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भोंदूबाबा राजेंद्र गडगे याच्यासह मधुकर शिंदे (रा. रहिमपूर, संगमनेर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
काल, शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मागदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे आणि मधुकर शिंदे यांना वडगाव पान येथून ताब्यात घेत अटक केली.
गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गडगेबाबा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत आहे. कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्राने बरे करणे, निपुत्रिक महिलांना मूल होण्याचे आमिष दाखवणे, घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली तो नडलेल्या लोकांकडून ११ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंत रकमा उकळत आहे. विज्ञानाने हात टेकलेल्या आजारांवर मंत्रांच्या साह्याने उपचार करण्याचा दावा करून त्याने अनेक रुग्णांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गडगे बाबा हा गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव पान परिसरात ‘दत्तधाम सरकार ‘ नावाचा मठ चालवतो. या बाबाने दत्तधाम सरकार नावाचे समाज माध्यमात विविध ठिकाणी खाते उघडलेले होते. त्यावर चित्रफिती प्रसारित करून तो आपल्या करामतींची जाहिरात करत असे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काही वर्षांपासून या बाबा विरोधात स्थानिक पोलीस ते जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशा अनेकांकडे तक्रारी दिल्या होत्या. परंतु त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नव्हती.
नाशिकच्या अशोक खरात या भोंदूचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर गडगे बाबाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आठवडाभरापूर्वीच याबाबत पुन्हा नव्याने तक्रार केली होती, मात्र त्याचीही दखल घेतली गेली नव्हती. त्यानंतर बाबाने समाज माध्यमात विविध चित्रफिती प्रसारित करत आपल्याला ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, पोलीस आपल्याकडून पैसे मागत असल्याचा आरोप त्या चित्रफिती केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
गेल्या काही वर्षांपासून हा भोंदूगिरीचा प्रकार उघडपणे सुरू असतानाही पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. इतकेच नव्हे तर, काही पोलीस अधिकाऱ्यांनी या महाराजाला संरक्षण दिल्याचेही आरोप होत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे करत आहेत.
