सातारा : ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई (सातारा) येथे २१ ते २५ मे या कालावधीत ‘लघु कुंभमेळा’ होत आहे. महागणपती घाटावर आयोजित या भव्य सोहळ्यात देशभरातून आलेल्या शेकडो साधू, नागा संन्यासी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कुंभमेळा सर्वांत मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे. यामध्ये प्रमुख आकर्षणे आणि उत्तम व्यवस्थापन यांचा मेळ पाहायला मिळतो आहे.कुंभमेळ्यातील सर्वांत प्रमुख आणि भव्य आकर्षण म्हणजे आखाड्यांमधील साधू-संतांचे शाही स्नान होणार आहे. येथे विविध आखाड्यांची भव्य शिबिरे, संतांची प्रवचने, ध्यान-योग शिबिरे आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी महाराज यांच्यासह अनेक पीठाधीश्वर आणि हठयोगी उपस्थित आहेत. दररोज सायंकाळी ६:३० वाजता पवित्र कृष्णमाईची आरती होत आहे. गर्दीच्या नियोजनासाठी पोलीस बंदोबस्त, २४ तास सीसीटीव्ही नजर, वैद्यकीय मदत केंद्रे आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहेत.भाविकांच्या सोयीसाठी घरबसल्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबवर थेट प्रक्षेपणाची सोयदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवसभर मोठी गर्दी होत आहे. सायंकाळी मात्र गर्दीचा महापूरच येत आहे. वाई शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक कुंभमेळ्यात उपस्थिती लावत आहेत. नगराध्यक्ष अनिल सावंत आणि संयोजन समिती सर्वांचे स्वागत आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत.
अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पावन ‘दक्षिण काशी’ अर्थात वाई शहराचे माहात्म्य संपूर्ण जगभर पोहोचावे, या उदात्त हेतूने वाईत प्रथमच अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात ‘लघु कुंभमेळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. वाई नगर परिषद आणि ‘लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम’ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपर्यंत कृष्णाकाठच्या पवित्र महागणपती घाट येथे हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे.
या लघुकुंभ मेळ्या’चा फीत कापून व शंकराच्या व महागणपती च्या प्रतिमांचे पूजन करून गुरुवारी उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, गुजरातहून आलेले परमपूज्य महंत महादेवगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत उपस्थित होते.
कृष्णामाईच्या पवित्र तीरावर आयोजित करण्यात आलेला हा लघु कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून हिंदुत्वाच्या संस्कारांचा, अध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव आहे असे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून आयोजक, साधुसंत, नगराध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हा दिव्य सोहळा यशस्वी होत आहे. वाईच्या या लघु कुंभमेळ्याची महती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल असे ते म्हणाले
यावेळी गुजरात अटल धामचे महंत महादेवगिरीजी महाराज म्हणाले, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते व हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते.” असे ते म्हणाले.
