Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

अमरावती : गेल्या अनेक वर्षांची मागणी, कृती समितीची मोहीम आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून जागानिश्चितीनंतर आता पुढील शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार का, याची प्रतीक्षा आहे.

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदगावपेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर उभारण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यासाठी जागेची निश्चिती झाली असून, चारसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सूचनांनुसार सुसज्ज महाविद्यालय आकारास येणार आहे.

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अस्तित्वात असल्याने हा विषय मागे पडला होता; पण २०१७ पासून या मागणीला धार आली. वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) २०१९ मध्ये समिती स्थापन केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे जानेवारी, २०२१ मध्ये हा विषय राज्य मंत्रिमंडळासमोर आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. आता जागेचाही प्रश्न सुटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.  नांदगावपेठमधील सुमारे १८.५३ हेक्टर शासकीय जमीन महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डॉ. संजय पराते यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समितीने अमरावतीला भेट दिली. डॉ. पराते यांच्यासोबत डॉ. विजय शेगोकार, डॉ. तारकेश्वर गोडघाटे, डॉ. व्ही. आय. खंडाईत, संजय देशमुख हे होते. कृती समितीने किरण पातूरकर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.  पुढील शैक्षणिक सत्रात महाविद्यालय सुरू होऊन प्रवेश सुरू व्हावेत. १५० खाटांचे रुग्णालय असावे, डिसेंबरच्या आधी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे मान्यतेसाठी अर्ज करावा, अधिष्ठात्यांची नियुक्ती करावी, आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त करावा, निधी उपलब्ध करून द्यावा, नवीन इमारत बांधकाम होईपर्यंत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महाविद्यालय त्वरित सुरू होऊ शकते, त्यासाठी हालचाली सुरू कराव्यात, अशा मागण्या कृती समितीने केल्या. समिती स्थापन

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी समन्वय अधिकारी व तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पराते यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. तारकेश्वर गोडघाटे, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही.आय. खंडाईत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून डॉ. विजय शेगोकार यांच्याकडे, तर प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जागेची निश्चिती झाली आहे, आता महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

– यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती</p>

अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. सरकारने पुढील सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

– किरण पातूरकर, अध्यक्ष, कृती समिती