अहिल्यानगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात काल, बुधवारी रात्री वादळी वार्यासह पावसाने शेवगाव तालुक्यात अंगावर भिंत पडून एका महिलेचा मृत्यू तर २ जण जखमी झाले. याशिवाय पाच तालुक्यात १५६ घरांची पडझड झाली, २० ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. जखमींमध्ये शेवगाव व जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान या पावसामुळे अहिल्यानगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, संगमनेर तालुक्यातील ९७ गावामधील ५८७.२४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ९९५ शेतकर्यांना त्याचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सायंकाळनंतर वादळी वार्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार वार्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. या वादळी पावसामुळे नेवासा, पाथर्डी, शेवगाव, अहिल्यानग, कर्जत, जामखेड, संगमनेर तालुक्याला जोरदार तडाखा बसला आहे. या पावसामुळे घरांसह शेतात उभे असणारे चारा पिके, जनावरांचा कोरडा चार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज, गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी वादळी वार्यासह झालेल्या पावसात शेवगाव तालुक्यातील दहिफळे गावात बैलगाडीवर झाड कोसळून इराबाई अशोक भोसले (५७) या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा नातू ओंकार जयराम भोसले (वय १६) हा जखमी झाला. तर जामखेडमध्ये भिंत पडून १ जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली, मात्र जखमीचे नाव समजले नाही. यासह नगर तालुक्यात ४, जामखेड तालुका २१, कर्जत १७, नेवासा ८७, पाथर्डी २५, संगमनेर २ अशा १५६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नेवासा तालुक्यात १० ठिकाणी, जामखेड ५, नगर व कर्जत प्रत्येकी १ अशा २० जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसात झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अहिल्यानग, पाथर्डी, कर्जत, नेवासा, शेवगाव या पाच तालुक्यातील ९७ गावे बाधित झाली असून या गावातील ५८७.२४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ९९५ शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात महावितरणचे नुकसान झालेले असून अनेक ठिकाणी वीज खांबावर झाडे कोसळल्यामुळे तर काही ठिकाणी पोल तुटल्याने वीजपुरवठा आज दिवसभर बंद होता. महावितरणतर्फे तातडीने अशा ठिकाणी पोल उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून अनेक भागात गुरुवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता.
आज, गुरूवारी सकाळी नोंदवलेला गेल्या २४ तासातील पाऊस तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (आकडेवारी मिमी.मध्ये) नगर- २१.४, पारनेर- ९.९, श्रीगोंदा- २२.२, कर्जत- १९, जामखेड- ७.२, शेवगाव- २४.९, पाथर्डी- २१.२, नेवासा- १०.९, राहुरी- २.८, संगमनेर- ४.२. अकोले- २.१, कोपरगाव- ५.५, राहाता- ४.२.