scorecardresearch

“भोंगे बंद करायचे असतील तर स्वतः रस्त्यावर उतरा”; माजी मनसे कार्यकर्त्याचे राज ठाकरेंना आव्हान

आपले वक्तृत्व चांगले आहे पण कतृत्व नीट ठेवावे, असेही या माजी मनसे कार्यकर्त्याने म्हटले आहे

Former Mns worker challenge to Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. यावरुन आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना न सांगता स्वतः रस्त्यावर उतरावे असे आव्हान एका माजी मनसैनिकाने केले आहे.

राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांच्याच एका माजी मनसैनिकाने आव्हान दिलं आहे. सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी राज ठाकरे सोलापूरात आले तर त्यांचा ताफा अडवण्यात येईल असा इशाराही दिली आहे. प्रहार संघटनेकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

“मी मनसेमध्ये तीन वर्षे काम करत होतो आणि राज ठाकरेंना फार जवळून पाहिलेले आहे. ज्यावेळेस मनसेने टोल प्रश्न हाती घेतला होता त्यावेळी टोलनाका फोडल्यानंतर राज ठाकरेंनी  मुंबईला बोलावून सुस्ती केली होती. आज प्रहार पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे ते पाहा. आपल्या बोलण्यामुळे, भांडणे लावून देण्यामुळे अकरा आमदार होते तिथे आत एकच आमदार झाला आहे. आपले वक्तृत्व चांगले आहे पण कतृत्व नीट ठेवावे. मुस्लीम बांधवांवर तुम्ही तोफ डागत असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष आणि इतर संघटनेचे सर्व समाजबांधव हे तुमचा पुतळा जाळतील असा इशारा अजित कुलकर्णी यांनी दिला.

“तुम्ही माझा ताफा अडवणार आहेत असे म्हणालात. पण तुम्ही काय फार मोठे नाहीत किंवा तुम्ही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत. तुम्ही सामान्य नागरिक आहात. तुम्हाला भोंगे बंद करायचे असतील तर तुम्ही कार्यकर्त्यांना घेऊन न जाता स्वतः रस्त्यावर उतरा. मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही सोलापूरात आल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्ष तुमचा ताफा अडवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही कुलकर्णी यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Want to turn off the speakers take to the streets yourself former mns worker challenge to raj thackeray abn

ताज्या बातम्या