वर्धा : मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई; एकाच दिवसात सुमारे चार लाखांचा दंड वसूल

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने केली धडक कारवाई

वर्धा : मास्क न घालणाऱ्यांवर प्रशासनाने रविवारी धडक कारवाई केली.

करोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना राबवल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज आणि उद्या मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार, आज रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत १,९६८ लोकांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. यातून ३ लाख ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण करोनाचा संसर्ग थांबवू शकतो. लोकांनी स्वयंप्रेरणेने या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाने वारंवार केले आहे.
तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रशासनाला पुन्हा दंडात्मक कारवाईची धडक मोहीम हाती घ्यावी लागली. यामध्ये एकसूत्र आणि धडक कारवाई असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज आणि उद्या जिल्हाधिकारी विवेक भीमानवार यांनी ठरवून दिल्यानुसार मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर प्रतिव्यक्ती २०० रुपये दंडाची वसुली करण्यात येणार आहे.

आज सकाळी ६ वाजल्यापासून या कारवाईला संपूर्ण जिल्ह्यात एकावेळी सुरुवात करण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाने कारवाई केली. नगरपालिका आणि ग्रामीण भागात ११ तास राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मास्क न वापरणाऱ्या एकूण १,९६८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यात ३ लाख ९४ हजार ६० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

आज सुटीचा दिवस असतानाही महसूल, पोलीस, नगरपालिका, ग्रामविकास या चार विभागांनी धडक मोहीम राबवून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. मास्क नसणाऱ्यांवर थेट कारवाई केली. या कारवाईत ३१० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wardha action against those who do not wear masks four lakh fine recovered in a single day aau

ताज्या बातम्या