संपूर्ण जिल्ह्य़ाचे लक्ष लागून राहिलेल्या वर्धा बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कांॅग्रेस-कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बहुमत प्राप्त केले असून, विद्यमान अध्यक्ष शरद देशमुख हे प्रचंड विरोधानंतरही निवडून येण्यात यशस्वी ठरले आहेत.
रविवारी झालेल्या या निवडणुकीची काल, सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे, विद्यमान अध्यक्ष शरद देशमुख यांच्या उमेदवारीकडेच सर्वाचे लक्ष लागलेले होते. विरोधी भाजप पॅनलने त्यांना लक्ष्य केले होतेच, पण सहकार गटाच्या फि तूर नेत्यांनीही त्यांच्या पराभवासाठी जंगजंग पछाडले. या एकाच नावाभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने त्यांचा विजय जाहीर होताच सहकार गटात जल्लोष पसरला. त्यांच्यासोबतच एकूण ११ उमेदवार विजयी झाल्याने गड आलाच, पण सिंहही आला, असा दुहेरी आनंद राकॉं पॅनलला झाला. माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख व माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांच्याविरोधात भाजपचे खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भोयर असाच हा सामना होता. देशमुख-कांबळे गटाचे शरद देशमुख, श्याम कार्लेकर, रमेश खंडागळे, वैशाली उमाटे, सुरेंद्र मेहेर, पांडूरंग देशमुख यासह ११ उमेदवार विजयी झाले, तर भाजपचे ३ व अपक्ष ३ निवडून आले.