scorecardresearch

धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान: अतुल लोंढे

भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

atul londhe
atul londhe

जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधू संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ज्या धीरेंद्र शास्त्रीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला, त्यावर राज्य सरकार कुठलीच कारवाई करत नाही. उलट मीरा रोड येथील दोन दिवसांच्या कार्यक्रमाला परवानगी देते. काँग्रेस पक्षाने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. काही संघटनांनी सुद्धा या कार्यक्रमाला विरोध केला आहे, असे असतानाही भाजपाप्रणित सरकार या कार्यक्रमाला परवानगी देऊन ते मनुवादी आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. वारकरी संप्रदायाने कधीही जात-पात पाहिली नाही. जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाला माननाऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले आहे की, भाजपा वारकरीविरोधी आहे.

जातीपातीच्या वर जाणून एकमेकांना माऊली म्हणणारा वारकरी संप्रदाय भाजपाला नको आहे, असे संत, महापुरुष भाजपाला नको आहेत. त्यांना मनुवाद करणारे, जातीभेद करणारे, धर्मावरून तेढ निर्माण करणारे बागेश्वर धामच्या भोंदूबाबासारखे लोक त्यांना हवे आहेत, असा टोलाही अतुल लोंढेंनी लगावला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नखाचीही सर ज्या व्यक्तीला नाही, अशा बागेश्वरला काही लोक महाराज म्हणतात. त्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतो. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे बागेश्वर? तरीही काही लोक त्याला मोठं करीत आहेत. तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वरचं कीर्तन महाराष्ट्रात होणं हा दुर्दैवी प्रकार आहे. ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे ते १०० टक्के महाराष्ट्रद्रोही आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्र डागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 17:38 IST