संविधानाच्या सन्मानार्थ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ सोलापुरात काढण्यात आलेला बहुजन क्रांती महामोर्चा आर्थिक रसद नसतानाही यशस्वी झाला. यापूर्वी गेल्या २१ सप्टेंबर रोजी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मराठा महामोर्चासाठी मिळालेली आर्थिक रसद मोठी होती. त्या तुलनेत आर्थिक रसद आणि एकूणच नियोजन यंत्रणा तोकडी असूनही बहुजन क्रांती महामोर्चासाठी दोन लाखांहून अधिक जनसमुदाय सहभागी झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. मराठा मोर्चाच्या प्रतिक्रियेतून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे काही पक्षांच्या राजकारणास आगामी जिल्हा परिषद आणि सोलापूर महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची लक्षणे आहेत.

मराठा समाजाच्या मोर्चामुळे जसा तो समाज एकवटला गेला तसाच त्या विरोधात सुप्त पद्धतीने अन्य जातीबांधवही एकत्र येत गेले आहेत. बहुजन क्रांती महामोर्चाच्या नावाखाली हा उर्वरित साराच समाज एकत्र येऊ लागला आहे. ज्या मराठा एकीकरणाचा काही राजकीय पक्षांना फायदा वाटत होता, त्याच पक्षांना आता हे उर्वरित बहुजन समाजाचे एकीकरण धोकादायक ठरू लागले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत याचे प्रत्यंतर आल्याने ‘घडाळय़ाच्या काटय़ा’वर चालणाऱ्या पक्षाला याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

साधारणत: कोणताही मोर्चा हा शक्तिप्रदर्शनाचे निदर्शक ठरतो. अलीकडे अशी शक्तिप्रदर्शन घडविण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा देत सकल मराठा महामोर्चे राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्य़ातून निघाल्यानंतर त्यापाठोपाठ बहुजन क्रांती महामोर्चेही निघत आहेत. अशा महामोर्चामध्ये लाखोंचा जनसमुदाय सहभागी होण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहने व इतर पूरक व्यवस्था करावी लागते. खास करून ग्रामीण भागातून सहभाग दर्शविण्यासाठी वाहनांसह वाटेत चहा-नाश्ता-पाण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त ठरते. वातावरण निर्मितीसाठी प्रसिद्धिमाध्यमांची मदत घ्यावी लागते. गेल्या २१ सप्टेंबर रोजीच्या सकल मराठा महामोर्चासाठी पूर्वनियोजन करताना संयोजकांना समाजातील सर्वच घटकांकडून आर्थिक साह्य़ मिळाले होते. यात साखरसम्राटांपासून ते सामान्य शिक्षकांपर्यंत सर्वानीच आर्थिक मदतीचा हात दिला होता. सोलापुरातील एका बैठकीत अवघ्या पाच मिनिटांत तब्बल नऊ लाख ४२ हजारांचा निधी जमा झाला होता. सोलापुरातील महामोर्चासाठी ३३ लाखांपेक्षा जास्त निधी जमा झाला होता. या निधीच्या जोरावर सोलापुरात सात लाखांच्या गर्दीचा मराठा मोर्चा निघाला होता.

या तुलनेत कुठलीही आर्थिक रसद नसताना, संस्थांचे पाठबळ नसताना सोलापुरातील बहुजन क्रांती महामोर्चाला दोन लाखांपर्यंत लोक सहभागी झाल्याने सगळय़ाच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एका मोर्चाच्या प्रतिक्रियेतून मिळालेला हा उत्स्फूर्त सहभाग आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलास विरोध, मराठा समाजाचा ओबीसीमधील समावेशास विरोध या दोन मुख्य कारणांवरून या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. या जातीच्या आंदोलनातून अन्य जात बांधवांमध्ये निर्माण होत असलेली ही एकी काही राजकीय पक्षांसाठी मात्र धोक्याचा इशारा ठरणारी आहे.