सातारा : मायभूमीत मेलो तरी बेहत्तर, पण आता येथून माघार नाही, असा इशारा कोयना जलाशयातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या ठिकाणी चुली पेटवून या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा संसार थाटल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा अशा ७ प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव (ता. भिवंडी, जि. ठाणे) या ठिकाणी २०१५ मध्ये पुनर्वसन करण्यात आले. एकूण १२० प्रकल्पग्रस्त खातेदारांकरिता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून २४२ हेक्टर जागा दिली होती. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण ७० कुटुंबांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले. मात्र, स्थानिक आदिवासींच्या त्रासाला कंटाळून, तसेच पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावी परतण्याचे निश्चित केले.

सोमवारी सकाळी एकसळ सागाव (जि. ठाणे) येथून सुमारे ४० प्रकल्पग्रस्त जावली या जन्मभूमीत आले.घरे नाहीत, आडोसा नाही, वन्यप्राण्यांची भीती अशा वातावरणात सध्या हे प्रकल्पग्रस्त येथे ठाण मांडून बसले आहेत. याच मतदारसंघातील पुनर्वसन व मदत कार्यमंत्री मकरंद पाटील हे राज्यात नेतृत्व करतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावानजीकच भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. या वेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव येथे २०१५मध्ये पुनर्वसन करण्यात आले. एकूण १२० प्रकल्पग्रस्त खातेदारांकरीता केंद्र शासनाकडून २४२ हेक्टर जागा वाटप केली. त्यातील बहुतांश जागेवर स्थानिक आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले. प्रस्थापित आदिवासींच्या दमदाटी, मारहाणीला आम्ही कंटाळून गेलो. यामुळे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त मूळ गावी परतलो.– विठ्ठल ढवळे, प्रकल्पग्रस्त,वासोटा