Rohit Pawar on Black Box of Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहे. हा अपघातच होता की घातपात होत यावर विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान, विमानातील तांत्रिक अडचणींची माहिती देणाऱ्या ब्लॅक बॉक्सबाबतही अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, यावर आमदार रोहित पवार यांनी आता भाष्य केलं आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तसंच, तपासणीसाठी हे ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे, असंही म्हटलं जातंय. दरम्यान, यावर रोहित पवारांनीही आता शंका उपस्थित केलीय. ते म्हणाले, “ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता, हा घातच होता हे क्लिअर होईल.”
तसंच, ते म्हणाले, “अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही. केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी ५ दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! दोन दिवसात पुन्हा पत्रकार परिषदेत भेटू.”
रोहित पवारांचा DGCA वरही संशय?
“स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी”, असंही रोहित पवार म्हणाले.

