Who is Om Prakash Khursade : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठं यश मिळवलं असून भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या युतीने दणदणीत विजय मिळवत मोठं यश मिळवलं, तर महाविकास आघाडीला हवं तेवढं यश मिळवता आलं नाही.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या या निवडणुकीच्या निकालात आता सर्वाधिक चर्चा वाशिममधील मालेगाव नगरपंचायतीच्या निकालाची होत आहे. कारण मुस्लिमबहुल मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते ओम प्रकाश खुर्साडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
ओम प्रकाश खुर्साडे काय म्हणाले?
मालेगाव नगरपंचायतीत झालेल्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना ओम प्रकाश खुर्साडे यांनी म्हटलं की, “हा विजय माझा नाही तर जनतेचा आहे. जनतेने मला आशीर्वाद दिला आहे. हा विजय त्या लोकांचा आहे ज्यांनी आम्हाला मतांच्या माध्यमातून आशीर्वाद दिला आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे आणि भावना गवळी यांनी निवडणुकीपूर्वी आमच्यासाठी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे हा विजय जनतेचा आहे”, अशी प्रतिक्रिया ओम प्रकाश खुर्साडे यांनी दिली.
#WATCH | Washim, Maharashtra: Shiv Sena's Om Prakash Khursaday wins Malegaon Nagar Panchayat Election, says, "… This victory belongs to the people who blessed us with their votes. Our leader, Eknath Shinde, came here before the election to attend a meeting. This victory belongs… pic.twitter.com/WJ9BI4jjKz
— ANI (@ANI) December 21, 2025
दरम्यान, मालेगाव नगरपंचायतीत अमित झनक यांना धक्का बसला आहे. मालेगाव नगरपंचायत त्यांच्या हातातून निसटली आहे. मालेगाव नगरपंचायतीच्या १७ प्रभागांपैकी शिवसेना शिंदे पक्षाने सात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद जिंकलं आहे. काँग्रेसनेही सात नगरसेवक जिंकले आहेत.
राज्यात महायुतीची बाजी, तर भाजपा ठरला मोठा पक्ष
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्षच आमने-सामने आले होते. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, तरी देखील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारली आहे. महायुतीला २०७ आणि महाविकास आघाडीला ४४ आणि स्थानिक आघाडीला ३७ नगरपरिषद व नगरपंचायती जिंकण्यास यश आलं आहे.
