सोलापुरात यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पाठोपाठ सध्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी वाळू तस्करीच्या विरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे वाळू तस्करांकडून प्रशासनाचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या हेतूने संबंधित प्रांत व तहसीलदारांच्या हालचालींवर अहोरात्र पाळत ठेवली जात आहे. प्रांत वा तहसीलदार यांच्या निवासस्थानापासून ते कार्यालयापर्यंत तसेच ते जेथे जेथे जातात, तेथे सर्व ठिकाणी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. संबंधितांवर यापूर्वी फौजदारी कारवाई झाली तरी पाळत ठेवण्याचे प्रकार न थांबता सुरूच असल्याचे दिसून येते.
सोलापूर जिल्ह्य़ात भीमा, सीना, नीरा आदी नद्या वाहतात. विशेषत: भीमा नदी महत्त्वाची मानली जाते. नदीच्या पात्रातून बेकायदा होणारा वाळू उपसा रोखण्यासाठी यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रभावी उपाययोजना राबविली होती. त्यातून ८० कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला होता. त्यांच्या पश्चात सध्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनीही तोच कित्ता गिरवून वाळू तस्करीविरुद्ध परिणामकारक उपाययोजना अमलात आणल्या आहेत. तथापि, प्रशासन कितीही कठोर पावले उचलत असले तरी वाळू तस्करांनी चोरटय़ा मार्गाने का होईना आपल्या कारवाया चालूच ठेवल्या आहेत.
नदी पात्रातून होणारा वाळू उपसा व वाहतूक पकडण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व त्यांची भरारी पथके रात्री अपरात्री धाडी घालत फिरतात. वाळू तस्कराविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असता अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने घालून जीवे ठार मारण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अकलूज भागात तत्कालीन प्रांत अमृत नाटेकर यांच्यावर असा प्रसंग गुदरला होता, तर दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार म्हणून काम करताना शिल्पा ठोकडे यांनी वाळू तस्करांविरुद्ध रोजच दोन हात केले होते. त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पंढरपूर तालुक्यात पोहोरगाव येथे नुकताच वाळू तस्करीतून वाळू ठेकेदाराच्या कामगाराचा खूनही झाला आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने वाळू तस्करांविरुद्ध आणखी कठोर पाऊल उचलले आहे.
तथापि, एकीकडे वाळू तस्करीच्या संदर्भात प्रशासन कठोर झाले तरी चोरटी वाळू तस्करी पकडली जाऊ नये म्हणून प्रशासनातील संबंधित प्रांत किंवा तहसीलदारांवर पाळत ठेवण्याचे प्रकार अद्यापि सुरूच आहेत. सकाळी निवासस्थानातून कार्यालयात जाईपर्यंत तसेच सायंकाळी कार्यालयातून निवासस्थानी जाईपर्यंत, इतकेच नव्हे तर रात्री निवासस्थानातून अन्यत्र कोठेही जायचे तर अधिकाऱ्यांच्या मोटारीमागे पाळत ठेवणाऱ्या मोटारसायकलस्वारांचा ताफा निघतो. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्रभर पाळत ठेवली जाते. अधिकारी विजापूर रस्त्याच्या दिशेने निघाले तर त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्यांकडून पुढे सोरेगाव, बसवनगर, टाकळी येथील आपल्या साथीदारांना मोबाइलद्वारे सतर्क करून अधिकाऱ्यांचा ठावठिकाणा तथा ‘लोकेशन’ कळविले जाते. अधिकाऱ्यांवर पाळत ठेऊनच वाळू तस्करी केली जाते. टाकळीजवळ भीमा नदी पात्राजवळ असलेल्या टाकळी-तेरा मैल भागात तर अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी वाळू तस्करांचे बैठे पथक तैनात असते. पाळत ठेवणाऱ्या तरुणांना दररोज प्रत्येकी तीनशे रुपयांचा मेहनताना आणि दोन लिटर पेट्रोल दिले जाते. पाळत ठेवण्यासाठी चार चाकी वाहनांचाही वापर केला जातो. चार चाकी वाहनांचा वापर केवळ पाळतीसाठी नव्हे तर अधिकाऱ्यांची मोटार पुढे जाऊ नये व वाळू तस्करांवर कारवाई करता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक अडथळा आणण्यासाठी केला जातो. हा ससेमिरा चुकविण्यासाठी कधी कधी अधिकाऱ्यांना कारवाईसाठी बाहेर पडताना चक्क ‘बुरखा’ परिधान करावा लागल्याचीही उदाहरणे आहेत.
या संदर्भात यापूर्वी सोलापूर विभागाचे प्रांत श्रीमंत पाटोळे यांच्या वाहनांचा पाठलाग केल्याप्रकरणी अलीकडे सोलापुरात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप पोलीस ठाण्यात वाळू तस्करांच्या हस्तकांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. यापैकी विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्य़ात बाळप्पा भीमाशंकर चडचण (२९) व वीरपाक्ष शंकर कोणदे (२१, रा. विंचूर, ता. दक्षिण सोलापूर) हे दोघे आरोपी आहेत, तर मंद्रूप पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ात १४ मोटारसायकलस्वारांचा सहभाग होता. वाळू तस्करांवर कारवाई करू नये म्हणून त्यांच्यावर रात्रंदिवस पाळत ठेवली जात असल्यामुळे संबंधित अधिकारी व त्यांचे कुटुंबीय मानसिक तणावाखाली असतात. त्यामुळे आता वाळू तस्करीविरुद्ध कारवाईसाठी जाताना सोबत पोलीस सुरक्षा घेण्याची गरज असल्याचे बोलले जाते. तसेच अशा वाळू तस्कर व त्यांच्या हस्तकांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची मागणीही पुढे येत आहे.