जलजागृती सप्ताह सुरू
सर्व सजीव सृष्टीला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हे जीवन आहे तसेच ते अमूल्य आहे. म्हणून पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहोचावा यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत असा संदेश जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिला. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १६ ते २२ मार्च २०१६ या कालावधीत आयोजित केलेल्या जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता अ. शा. काळोखे, कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, स. गें. गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या वेळी रायगड जिल्ह्य़ातील आंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, म्हसळा खोरे, उल्हास या नद्यांतील पवित्र जल एकत्र करून जलकलशाचे पूजन या वेळी जल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
पाण्याचे यथायोग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने पाणी बचतीचा अवलंब करावा, असे सांगून त्यांनी जलजागृती सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना शुभेच्छा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पाणी हे फुकट मिळते ही आपली धारणा होते. त्यामुळे त्याचा मुक्त वापर होतो; परंतु पाणी हे अमूल्य आहे. दैनंदिन कामकाज करताना आपण आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करावा. पाण्याचा नळ आवश्यक असेल तेव्हाच सोडावा. छोटय़ा बाबींमध्ये पाण्याची बचत केली तर त्याचा उपयोग सर्वानाच होईल. पाणी बचतीची सवय प्रत्येकानेच अंगीकारावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व या सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अधीक्षक अभियंता अ. शा. काळोखे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश दुसाने यांनी केले. रायगड जिल्ह्य़ातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची माहिती सादरीकरणाव्दारे देण्यात आली. जनजागृतीबाबत कार्यक्रम कलापथकाद्वारे सादर करण्यात आले.