जिल्ह्यातील अनेक खेडय़ांमध्ये टंचाईचे संकट घोंघावू लागले असून सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वलवाडी, वाडीभोकर येथे १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
वलवाडी ग्रामपंचायत हद्दीत नोकरदारवर्ग मोठय़ा प्रमाणावर वास्तव्यास असल्यामुळे पाणीपट्टी, घरपट्टीचा भरणा नियमित होतो. त्या तुलनेत सुविधा मात्र उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. अनेक वर्षांपासून वलवाडीकरांना सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी योजनेचे काम त्वरीत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ग्रामपंचायतींच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण झाले नाही. कॉलनी परिसरात १५दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. एस. आर. पाटील शाळेपासून जवळच असलेल्या वसाहतीत तर पाण्याचा लवलेशच नाही.
या परिसरातील बहुतांश कुटुंबांना एनसीसी ऑफिसशेजारी असलेल्या व्हॉल्व्हच्या गळतीचा आधार घ्यावा लागत आहे. पितांबरनगर टाकीपर्यंत पाणी पोहचत नसल्याची वास्तवता आहे.
परिणामी, नगावबारीपासून तर थेट आदर्श शैक्षणिक संकुलापर्यंतच्या वसाहतीपर्यंत सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी हे नागरिकांना प्रशासनाकडे टँकरचा प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगत आहेत. विशेष बाब म्हणजे वलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ४५० कॉलन्यांचे प्रतिनिधित्व करणारे समाजकल्याण सभापती शांताराम राजपूत, पंचायत समिती सभापती ज्ञानज्योती भदाणे, आमदार कुणाल पाटील यापकी कोणीही पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वलवाडीपाठोपाठ आता वाडीभोकरकरांवरदेखील जलसंकट ओढवले आहे. वाडीभोकरमध्ये १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एस. आर. पाटील माध्यमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस पाझर तलाव आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यापर्यंत या तलावात पाणी होते. परिणामी, या परिसरातील खासगी विहिरींसाठी तलाव आधार होता. यंदा त्यातही मोठी घट झाली आहे.