गोदावरी खोऱ्याच्या ऊध्र्व भागात, म्हणजे नगर जिल्ह्य़ातून पाणी सोडताना खळखळ झाली खरी; पण गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी जायकवाडीला पाणी देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आणि सोमवारी दुपारी त्यांनी अंमलबजावणीला वेग दिला. तसा पाण्याचा वेगही वाढला. मुळा धरणातूनही दुपारी १ वाजता २ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
दरम्यान, शनिवारी (दि. ६) भंडारदऱ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग ४ हजार ८१६ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. उद्या (मंगळवारी) तो ६ हजार क्युसेकहून अधिक होईल. त्यामुळे जायकवाडीकडे झेपावलेले पाणी लवकरच पोहोचेल, असा अंदाज जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना आहे.
जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर या आदेशाला स्थगिती मिळावी, या साठी एका बडय़ा नेत्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या हस्तक्षेपामुळे त्यावर सोमवारी काही निर्णय होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस संरक्षण घेण्यात आले आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक धरणावरील प्रमुख अधिकाऱ्याला दोन पोलीस व धरणावरही पोलीस बंदोबस्त मागितला होता. मुळा व भंडारदरा या दोन्ही प्रवाहांतून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गंगापूर समूहातून ४३ दलघमी व पालखेड समूहातून ५९.६६ दलघमी पाणी सोडून गोदावरी व दारणा समूहातील तूट भरून काढण्याचे सरकारचे निर्देश होते. पोलीस अधीक्षकांनाही त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पाणी सोडण्यापूर्वी प्रवाह चालू असतानाही त्याची छायाचित्रे काढावीत व व्हिडिओ शूटिंगही करावे, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे गोदावरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्य़ात या साठी काही आंदोलने झाली का, याचा तपशील उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले.